भिवंडी दि.२० ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील पोलिसांच्या नजरेतून सुटण्याच्या निमित्ताने सध्या बांगलादेशी नागरिकांनी ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे. भिवंडी ग्रामीणमधील पिंपळघर येथे कोनगाव पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकास अटक केली आहे.सध्या ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे. त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक कामासाठी मनुष्यबळ कमी असल्याने अनेक ठिकाणी छुप्यारितीने बांगलादेशी नागरिक काम करून राहत आहे,असे गेल्या काही महिन्यापासून झालेल्या कारवाईत दिसून आले आहे. नुरहुसेन अब्दुल सलाम शेख(३२) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून तो ग्रामीण भागात प्लम्बिंगचे काम करीत होता आणि पिंपळघर येथील विजय भोईर चाळीत राहत होता. भारतात येण्यासाठी पारपत्र आणि व्हिसा नसताना पैसे कमविण्यासाठी छुप्या मार्गाने भारतात आल्याने नुरहुसेन शेख याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
