बोध कथा “उद्याची चिंता

लेख

*
—————————————-

*कथा*

*एक राजा असतो. दरबारी अनेक नोकरचाकर, साम्राज्य मोठे, खजिना सोन्याने भरलेला, तरी राजा नेहमी टेन्शन मध्ये असायचा. कुठून शत्रू येईल का ? सैन्यात बंड होईल का ? आपला मुलगा उद्या चांगला राजा बनेल का ? या विचाराने तो त्रस्त असायचा.*

*त्याची दाढी कटिंग मालिश करायला एक न्हावी यायचा. तो मात्र एक अविवाहित मस्त मौला होता, नेहमी खुश व हसत खेळत काम करायचा. त्याला पाहताना राजाला असूया वाटू लागली.*

*राजा विचार करायचा की, “मी राजा आहे, इतके धन कमावतोय, तरी रात्री झोप शांत लागत नाही. सतत टेन्शन आहे. मग हा इतका कसा आनंदी असतो?”*

*या विचारातूनच राजाची चिंता अजून वाढली. शेवटी राजाने त्याच्या प्रधानाला विचारले, की, “आपण सगळे चिंतेत, पण तो एकटाच खुश कसा ? त्याचा शोध घ्या.”*

*प्रधान त्या मस्त मौलाच्या घरी गेला. त्याच्याशी गप्पा मारताना विचारले की, “तू इतका खुश कसा ?”*

*त्यावर मस्त मौला म्हणाला, “मी सडा फटिंग, एकटाच असतो. दिवसाला एक रुपया मिळतो. त्यात भागते. उद्याची चिंता करत नाही. कारण उद्या पण एक रुपया पुन्हा मिळतोच न !! त्यामुळे मी निवांत झोपतो. “उद्याची” काळजी करत नाही.”*

*प्रधान दुसऱ्या दिवशी तो मस्त मौला कामावर गेलेला असताना त्याच्या घरी जातो आणि त्याच्या दाराजवळ ९९/- रुपयाची नाणी असलेली एक थैली ठेवून येतो. नंतर परत येऊन राजाला सांगतो, “काही काळजी करू नका. त्या मस्त मौलावर फक्त लक्ष ठेवा.”*

*मस्त मौला त्या दिवशी घरी जातो. दारात थैली सापडते. उघडून पाहतो तर ९९/- रुपये दिसतात. तो चकित होतो. विचार करत बसतो. की, यात फक्त अजून एक रुपया टाकला तर शंभर होतील. आपण रोज पायी जातो. पाय दुखतात! त्याऐवजी एखादा घोडा या पैशात घेता येईल. उद्याचा मिळालेला एक रुपया खर्चण्यापेक्षा वाचवू. एक दिवस उपास केला तर काय आपण मरत नाही.”*

*असे म्हणून तो दुसऱ्या दिवशी उपाशी राहतो. आता त्याच्याकडे शंभर रुपये होतात. बाजारात घोडा घ्यायला जातो. तर त्याला तो घोडा आवडतो, तो एकशे पाच रूपयाला असतो. मस्त मौला विचार करतो, एक दिवस उपास केलाच आहे. अजून असेच पाच दिवस उपास करू. फार तर एक दिवसाआड उपास करू. म्हणजे दहा दिवसात का होईना मनासारखा घोडा घेता येईल.*

*झाले ! इथेच त्याचे वाट्टोळे होणे सुरू झाले. कारण ज्याने फक्त “आज” चा विचार करून मस्त जगत होता. कधीच “उद्याचा” विचार केला नव्हता, तो आता चक्क पुढच्या दहा दिवसाचे नियोजन करू लागला. डोक्यात कायम पैसे बाजूला ठेवणे हेच सुरू झाले. त्यातून त्याचे कामावर लक्ष कमी झाले. हसणे कमी झाले. उपास घडू लागल्याने तब्येत खंगत चालली, आणि हसते खेळते जीवन काळजीने व्यापू लागला.*

*बोध*

*उद्याची चिंता करून आपल्या हातात जो आज असतो, तोही आपण घालवतो. “स्वतः “वर विश्वास असेल तर “उद्या” पण चांगलाच येईल की. त्यासाठी “आज” का खराब करून घ्यायचा ?*

*हातात आलेला प्रत्येक क्षण मस्त जगून घ्यायचा. हातात जे ९९/- रुपये आहेत (म्हणजे सुखाचे क्षण) ते सोडून त्याचे ‘शंभर” कधी होतील याचा विचार सोडून देणे.*
*जीवन क्षणभंगूर आहे आणि मृत्यू अटळ आहे !*

*************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *