जिमखाना, डोंबिवली येथे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा २०२२-२०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शारिरीक सुदृढता तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाचे योगदान देणारी ठरली. मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून दि. ३ मार्च २०२३ रोजी, सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ७०० दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता.
या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल व अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.रुपाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे श्री. संजय बागुल उपस्थित होते. उत्साही वातावरणात स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
मैदानी स्पर्धेत गोळा फेक, लिंबु चमचा, ५० मिटर धावणे, १०० मिटर धावणे अशा इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेत १०० शिक्षकांनी व २०० पालकांनी देखिल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पुढच्या वर्षी उत्तमरित्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येतील तसेच मैदानी खेळातील कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. अशी माहिती
जनसंपर्क अधिकारी
जिल्हा परिषद ठाणे यांनी दिली..
