नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठीतील जेष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.
‘ माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा.’
अशी मराठी भाषेची थोरवी कुसुमाग्रजांनी गायली आहे. कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी जनांना अभिमान दिला. कुसुमाग्रज हे मराठीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे.
जगभरात एकूण ६ हजार भाषा बोलल्या जातात. आपल्या देशात एकूण २२ अधिकृत भाषा असून मराठी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.सुमारे ९ कोटी लोकांची ही मातृभाषा आहे.
मराठी भाषेला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. महानुभाव पंथाने मराठीविषयी असलेल्या आत्मियतेच्या भावनेमुळे मराठीत ग्रंथ, स्तोत्र, काव्य लिहून मराठी साहित्यात मौलिक भर घातली आणि त्यानंतर वारकरी संप्रदायानेसुद्धा मराठी भाषा समृद्ध करण्यात खूप मोठे योगदान दिले. ‘ अमृतातही पैजा जिंके ‘ अशा शब्दात संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे. मराठी भाषा ही मधुर,प्रेमळ,रसाळ,लाघवी शब्दांनी सजलेली आहे. मराठी ही भक्तीची आणि शक्तीची भाषा आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे रक्षण केले. मराठी ही खूप श्रीमंत, वैभवसंपन्न आणि गौरवशाली भाषा आहे. त्यामुळेच या मराठी मायबोलीवर आपले अतोनात प्रेम असून मराठी भाषेसोबत आपले प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते आहे.
म्हणूनच प्रत्येकाला मराठीबद्दल टोकाचा अभिमान वाटतो.
कविवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेचा गौरव अशा ओळींमध्ये केला आहे.
‘ लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक
जाणतो मराठी
एवढ्या जगात माय
मानतो मराठी.’
या संपूर्ण जगात फक्त मराठी
भाषेलाच माय मराठी म्हटले जाते.
मराठी ही जगातील अशी एकमेव भाषा आहे, जी अ – म्हणजे अज्ञाना पासून सुरू होते आणि ज्ञ – म्हणजे ज्ञानापर्यंत नेऊन पोचवते. ज्या मराठी भाषेमध्ये आपण जन्मलो , ज्या मराठीने आपल्याला लहानाचे मोठे केले, घडवले , वाढवले तिच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा आजचा हा मंगल दिवस आहे. मराठी भाषेला नम्रतेचा दंडवत प्रणाम.
‘ ठासून भरला आहे अभिमान
मराठीचा आमच्या मनी
शुभेच्छा तुम्हा सर्वांना
मराठी भाषा दिनी .’
(निलेश किसन पवार
अनगाव , तालुका – भिवंडी ,
जिल्हा – ठाणे.)
