छत्रपती शिवाजी महाराज सर्वकालीन महान व आदर्श राजा

लेख
निलेश किसन पवार
अनगाव , ता – भिवंडी, जि – ठाणे.

आज १९ फेब्रुवारी शिवजयंती आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्या. शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो तसेच प्रत्येक मराठी माणसासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. इतिहासात अनेक राजे होऊन गेले पण सर्वात पराक्रमी , रणधुरंधर, आणि अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. शिवबांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.अगदी बालवयातच माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले.कोवळ्या वयात असताना राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे ती पूर्ण देखील केली.


शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. ते धर्म निरपेक्ष राजे होते. ते हिंदू असूनही त्यांनी कधीच मुसलमानांशी दूजाभाव केला नाही. राजांच्या राज्यात इतरांप्रमाणेच मुसलमानही सुखा – समाधानाने राहत होते.कारण शिवराय सर्वांचे होते. राजांनी जात – धर्म , स्त्री – पुरुष अशी कोणतीही विषमता न मानता प्रत्येकास समान न्याय या तत्त्वावर राज्य चालवले.
हे स्वराज्य उभे करत असताना शिवाजी महारांजांना अनेक अडचणी , समस्या आल्या. पण महाराज कधी निराश झाले नाहीत की हतबल झाले नाहीत.तर जिद्दीने , बुद्धीने, चातुर्याने समोर आलेल्या संकटावर मात करून राजांनी प्रचंड यश संपादन केले. आपल्यापेक्षा बलाढ्य आणि प्रबळ शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाहीत.भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी मनीही नव्हता. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली तरी त्यातून शांत राहून राजांनी मार्ग काढला. कारण राजे संकटसमयी
लढणारे होते , रडणारे नव्हते.
राज्यातील रयत म्हणजे राजांसाठी जीव की प्राण.शिवाजी राजे हे रयतेचे वाली होते. ते रयतेला पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळत असत. महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. शिवाजी राजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कधीही जातीभेद, धर्मभेद किंवा इतर धर्मांचा द्वेष केला नाही की कुणावर अन्याय होऊ दिला नाही. ढाल – तलवारीच्या गदारोळात मानवता वृद्धिंगत झाली पाहिजे हे महाराजांचे धोरण होते.
राजांचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे स्त्रियांप्रती असणारा अतूट आदर. परधर्मातील स्त्रीसोबतही राजांनी कधी गैर वर्तणूक केली नाही. तसेच ज्याने कोणी केली असेल त्याला राजांनी जबर शिक्षा केली.
महाराजांनी आपल्या वर्तणूकीतून दाखवून दिले की, राजा हा ‘ उपभोग शून्य स्वामी ‘ असतो. हे राज्य त्याच्या खासगी मालकीचे नसते तर ते केवळ रयतेचे राज्य असते.
शिवाजी महाराजांचे कार्य, कर्तृत्व हे जात, धर्म, पंथ, प्रांत , भाषा आणि राष्ट्राच्या सीमा ओलांडून वैश्विक दर्जाचे आहे. महाराजांचे जीवनचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या सर्वगुणसंपन्न, प्रजाहितदक्ष आणि युगप्रवर्तक आदर्श राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.
🚩 जय शिवराय 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *