ठाणे,
संविधानातील धर्मनिरपेक्षता हे मूल्य आपल्या देशाच्या एकतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हा शब्द जरी संविधानात नंतर घातला गेला असला तरीही त्याचा आशय संविधानातील सर्व संबंधित कलमांमधून प्रथमपासून व्यक्त होत होता, असे ठाम आणि नि:संदिग्ध प्रतिपादन महाविद्यालयीन युवांनी आज येथे केले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिके अंतर्गत संविधान सन्मान अभियानाच्या समापन कार्यक्रमात काल संविधानाच्या महत्वावर महाविद्यालयीन युवांचा टॉक शो आयोजित केला होता. या परिसंवादाचे सूत्र संचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानाचे अभ्यासक डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. त्यात ठाण्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मो.ह. कनिष्ठ महाविद्यालयातून अस्मिता जाधव, साहिल गायकवाड, आनंद विश्व गुरुकूल महाविद्यालयातून संग्राम खांबे, ऋषी रेडेकर, जोशी बेडेकर महाविद्यालयातून मयूरेश म्हात्रे, ख्रिश कोळी, तनुश्री बाणिक, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातून अभय जाधव, अंकीत यादव, ग्रामीण शिक्षण संस्था महाविद्यालयातून अनिता जाधव, आशिया खान आणि कळव्याच्या जानकीबाई रामा साळवी महाविद्यालयातून बालाजी पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. याच बरोबर समता विचार प्रसारक संस्थेचे अनुजा लोहार, सुशांत जगताप, स्मिता मोरे, राहुल माने, साहिल गायकवाड आणि प्रविण खैरालिया हे एकलव्य कार्यकर्ते या चर्चेत सहभागी झाले होते.

संविधानाच्या मूल्यांवर आणि आवश्यकतेवर निर्भीड चर्चा
स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती, धर्माच्या स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला होता. आता देश स्वतंत्र झाल्यावर त्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन नव भारताची वाटचाल लोकशाही, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांनी करावी म्हणून संविधान निर्माण करण्याची गरज भासली. संविधान निर्मितीचे कामही लोकशाही पद्धतीने सर्वांच्या सूचनांचा विचार करून त्यावर चर्चा करून झाले. संविधान ज्या मूल्यांच्या, विचारांच्या पायावर तयार झाले ती मूल्ये आणि विचार सामन्यातील सामान्य व्यक्तीला सहज आकलन व्हावे म्हणून उद्देशिका लिहिली गेली. उद्देशिकेची सुरुवात कोणत्याही देवाच्या, व्यक्तीच्या नावाने न करता ती आम्ही भारताचे लोक अशी केल्याने हे संविधान धर्म, जात, लिंग, पंथ, प्रांत या सर्वांपलीकडे जाऊन फक्त नागरिकांनी स्वतःला अर्पण केली आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असे विचार या परिसंवादा दरम्यान युवांनी व्यक्त केले. या पुढे जाऊन आजच्या काळात संविधानाचे आणि त्याबद्दल लोकांमधील जागृतीचे महत्व अधोरेखित करताना युवांनी त्यांना भेडसावणार्या ज्वलंत प्रश्नांना हात घातला. धर्म, जात या मुद्द्यांवर भर न देता शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा सारख्या समस्यांचा विचार निवडणुकीत व्हावा. संविधान साक्षरता ही शाळेपासून विद्यार्थ्यांमध्ये रुजवली गेली पाहिजे. लव जिहाद हा शब्द आम्ही गेल्या काही वर्षांपासूनच ऐकतो आहोत. आम्हाला आमचा साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, त्यात धर्माचा, जातीचा विचार न करता मानवतेचा विचार व्हावा असे सर्व युवांनी निक्षून सांगितले.
या वेळी मीडिया भारत न्यूज चे संपादक राज असरोंडकर उपस्थित होते. आपले विचार मांडताना ते म्हणाले भारतीय संविधान हे चांगला माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे. त्याचा आदर करायचा म्हणजे त्याचे प्रत्येकाने मनापासून पालन करणे आहे. आज सर्व प्रकारे मीडिया द्वारे खर्या, खोट्या, बुद्धिभेद करण्यार्या बातम्या येत असतात. युवांची जबाबदारी आहे की त्यांनी स्वतः विषयाची नीट माहिती घेऊन स्वतंत्रपणे विचार करावा. कुणाच्या सांगण्यावरून, प्रवृत्त करण्यावरून, भडकवण्यावरून वागू नये. सावध राहून सद्सदविवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिक महेंद्र मोने यांनी सर्व युवांनी या परिसंवादात अभ्यासपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले युवांनी आपला मताधिकार विचारपूर्वक बजावला पाहिजे. लोक कल्याणकारी आणि देश एकसंध ठेवून विकास करणारे सरकार निवडून देणे आपले कर्तव्य आहे. मुलांनी संविधानाच्या अंतस्थ मूल्यांवर लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला पाहिजे.
या वेळी सर्व सहभागी युवांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला असे या अभियानाचे संयोजक समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी आभार मानले. मो.ह. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. महादेव मोरे आणि डॉ. राजेंद्र गव्हाणे, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे प्रा. मनोहर ढोत्रे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, जयंत कुलकर्णी, लतिका सु. मो., मीनल उत्तूरकर, डॉ. गिरीश साळगावकर, सुप्रिया कर्णिक, उमाकांत पावसकर आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
