ठाणे :सर्व सामान्यांच्या जगणे दिवसेंदिवस अवघड बनते आहे. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण, वीजेच्या वितरणात खाजगी कंपन्या यातून परिस्थिती बिकट बनते आहे. ग्रामिण भागातही शेतकरी, कष्टकरी यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार अनेक नवीन नियमांच्या द्वारे संविधानाने रेखित केलेल्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला धक्का देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करण्याचा प्रयत्न चालू आहे. ठाण्यातील विविध वस्त्यांमध्ये या मुद्दयांवर व संविधानाबाबत जागृती करण्यासाठी सध्या नफरत छोडो संविधान बचाओ यात्रा सुरु आहे. रस्त्यावर चालूया, लोकांशी संवाद करूया…..प्रेमाचा संदेश देऊया, विद्वेषाला हरवूया! हा विचार घेऊन एकलव्य कार्यकर्त्यांसह अनेक संस्था संघटनांचे युवा कार्यकर्ते वस्तीतील लोकांशी संवाद करत गल्ली गल्लीतून फिरत आहेत. सर्वांशी संवाद करणे आणि लोकांमध्ये आपल्या संवैधानिक अधिकारांबद्दल जागृती निर्माण करणे हा या संविधान सन्मान यात्रेचा उद्देश आहे व तो सफल होताना दिसत आहे. आत्ता पर्यंत रमाबाई आंबेडकर नगर, खोपट ते आंबेघोसाळे तलाव, चिराग नगर, राजवाडा, गांधी नगर या परिसरात, वागळे इस्टेट विभागात, कळवा, महात्मा फुले नगर या परिसरात, लोकमान्य नगर, चैतन्य नगर, वर्तक नगर या विभागात पदयात्रा घेण्यात आल्या. तसेच राबोडी, कोपरी ठाणे पूर्व, ढोकाळी, मनोरमा नगर, मानपाडा, खारटन रोड, महागिरी आदी भागातही पदयात्रा फिरणार आहे. सर्व वस्तीतील अनेक कार्यकर्ते या यात्रेमध्ये जोडले गेले. वस्तीतील लोकांशी आंबेडकर. गांधी, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, महागाई अशा सदद्या लोकांना भेडसावणार्या अनेक बाबींवर मोकळा संवाद करण्यात आला. या बद्दल चर्चेत वस्तीतील युवांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. ठाणे शहरात समता विचार प्रसारक संस्थेसह जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज अभियान, श्रमिक जनता संघ, म्युज फाऊंडेशन, कायद्याने वागा लोकचळवळ, वाल्मिकी विकास संघ, गावठाण कोळीवाडे संवर्धन समिती अशा अनेक संस्था संघटना यात सामील झाल्या आहेत. जगदीश खैरालिया, हर्षलता कदम, लतिका सु. मो., शुभदा चव्हाण, अजित डफळे, प्रीती वर्मा, सुब्रतो भट्टाचार्य, सुनिल दिवेकर, सुशांत जगताप, येनोक कोलियार आदी कार्यकर्ते यात सामील होत आहेत.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दर वर्षी जानेवारी महिन्यात ३ तारखेच्या सावित्रीबाई फुले जयंतीपासून ३० तारखेच्या महात्मा गांधी स्मृतीदिना पर्यन्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिका आयोजित केली जाते. या वर्षी या व्याख्यानमाले अंतर्गत पदयात्रेतून प्रबोधन सुरु आहे. हा उपक्रम जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी व समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख, महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला असून देशातील अनेक राज्यांच्या विविध जिल्ह्यात याचे आयोजन होते आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यापासून ठाणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात ही यात्रा होत असून ३० जानेवारीला गांधी स्मृतीदिनी दिल्लीला राष्ट्रीय कार्यक्रम होत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद
भावी पदवीधर सुशिक्षित नागरिक या नात्याने आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संविधान सन्मानाप्रती विशेष जबाबदारी असल्याचे सांगत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संविधान अभ्यासक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी युवकांच्या जागृतीचे महत्व विषद केले. लोकवस्तीतील पदयात्रांबरोबरच ठाणे शहरातील कनिष्ट आणि वरिष्ठ महाविद्यालयात संविधान सन्मान व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. त्यावेळी माजिवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कनिष्ट महावियालयात आणि आनंद विश्वगुरु गुरुकुल वरिष्ठ महाविद्यायात ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानांना मुलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुलांना संविधानाबद्दल तुटपुंजी माहिती असते, त्यांना आपले संवैधानिक अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव त्यांनी आपल्या व्याख्यानात करून दिली. मो. ह. विद्यालय, मनिषा महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय व अन्य काही महाविद्यालयातही व्याख्याने होणार आहेत, अशी माहीती या अभियानाच्या संयोजक मीनल उत्तुरकर व वंदना शिंदे यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, या अभियानाचा समारोप शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी ठाणे स्टेशन जवळील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात या विषयावरील टॉक शो ने होणार आहे. या वेळी होणार्या संवाद चर्चेत, यात्रेत सहभागी झालेले युवक आणि महाविद्यालयातील युवक सहभागी होणार आहेत. संवेदनशील ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ९७६९२८७२३३ किंवा ८१०८९४९१०२ वर संपर्क करावा, असे आवाहन या उपक्रमाचे सहसंयोजक अजय भोसले यांनी केले आहे.
