भिवंडी दि.३१( गांवकरी TODAY NEWS ) टोरंट पॉवर कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य प्रशिक्षण सत्र नुकतेच आयोजित केले होते.या प्रशिक्षणात कार्डिओ-पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) आणि कॉम्प्रेशन-ओनली लाइफ सपोर्ट (सीओएलएस) तंत्रावर भर देण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉ.लकी कासट आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीच्या सदस्या डॉ.सुप्रिया लाड चिंचोलकर या ठाण्यातील दोन मान्यवर डॉक्टरांनी या सत्राचे आयोजन केले होते. प्रशिक्षणा दरम्यान २५० हून अधिक कर्मचाऱ्यांना विविध वैद्यकीय परिस्थितीविषयी माहिती देण्यात आली, जिथे सीओएलएस आणि सीपीआर जीवनरक्षक ठरू शकतात.वैद्यकीय मदत येईपर्यंत महत्त्वपूर्ण प्राथमिक मदत प्रदान करण्यासाठी डॉक्टरांनी या तंत्रांचे महत्त्व सांगितले.दरम्यान डॉक्टरांनी प्रशिक्षणासाठी आणलेल्या पुतळ्यांचा वापर करून सहभागींना प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आले.डॉ.लकी आणि डॉ. सुप्रिया या दोघांनीही टोरंट पॉवरच्या उपक्रमाचे कौतुक केले.आणि आणीबाणीच्या काळात जीव वाचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण सत्र, व्यक्तींना ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी सांगितले की कंपनी कर्मचाऱ्यांच्या कल्याण आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे.आणि कर्मचाऱ्यांची कामातील क्षमता वाढवण्यासाठी नानातऱ्हेने मौल्यवान प्रशिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
