लेखक – निलेश किसन पवार .अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे
नमस्कार मित्रांनो , आज 23 एप्रिल , जागतिक पुस्तक दिवस आहे. जगप्रसिद्ध नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिवसानिमित्त 23 एप्रिल हा दिवस ‘ पुस्तक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने पुस्तकांचे महत्व सांगणारा हा लेख.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘ ग्रंथ देवो भव ‘ असं म्हटलं जातं. म्हणजे पुस्तकांना देवाची उपमा देऊन मान आणि सन्मान देण्याची गोष्ट केली गेली आहे. ‘ वाचाल तर वाचाल ‘ हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजवलेला हा विचार आपल्याला वाचनाचे महत्व पटवून देतो. आपल्या जीवनात वाचनाला खूप मोठे महत्व आहे. वाचन केल्याने भरपूर फायदे होतात. वाचनातून माणसाला ज्ञान , चांगले विचार , प्रेरणा , स्फूर्ती , आत्मविश्वास, सकारात्मकता या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात. वाचन माणसाला निष्क्रियते पासून दूर नेऊन क्रियाशिल बनवते. वाचन हे मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे. वाचनामुळे आपला मेंदू तल्लख , तरतरीत , ताजातवाणा आणि चपळ राहतो. वाचन केल्याने माणसाचे मन उदार , विशाल बनते. अखंड वाचन चालू राहिल्यास माणसाची वैचारिक पातळी उंचावते आणि बौद्धिक सामर्थ्य वाढते. वाचनाच्या सवयीमुळे माणूस ज्ञानी , हुशार ,सुज्ञ , समजदार व प्रगल्भ बनतो.वाचनाच्या छंदामुळे आयुष्याला चांगले वळण लागते.
जीवनात माणसाला दोन गोष्टी घडवत असतात.
1) त्याला भेटलेली चांगली माणसं
आणि
2) त्याने वाचलेली पुस्तकं
पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पुस्तकांसारखा मित्र आणि गुरू या जगात कुणीच नाही. पुस्तके हे मित्राप्रमाणे आपले हितचिंतक आणि गुरुप्रमाणे आपले मार्गदर्शक असतात.
अनेक थोर माणसांच्या जीवनाला पुस्तकांमुळेच कलाटणी मिळाली . स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर , लोकमान्य टिळक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ. ए. पी. जे . अब्दुल कलाम या सर्वांना पुस्तक वाचनाचे जबरदस्त वेड होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांच्या सहवासात जास्त रमायचे. पुस्तके वाचल्यामुळेच तो ज्ञानाचा तेजोभास्कर डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडला. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सांगायचे , ‘ एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. ‘
पुस्तकांमधून आपल्याला उच्च कोटीचे ज्ञान मिळते. पुस्तके आपल्यावर अखंड ज्ञानाचा वर्षाव करतात आणि मौलिक विचारधन देतात. पुस्तके माणसाला जास्त समजदार व प्रगल्भ बनवतात. ज्याला पुस्तक वाचनाची आवड असते तो माणूस वाईट गोष्टींपासून दूर राहतो. पुस्तके वाचणारा कधी वाया जात नाही. पुस्तके वाचल्याने माणसामधले अवगुण दूर होऊन सद्गुणांचा संचय वाढत जातो. पुस्तकांशी जोडलेले नाते आपल्याला कधीच पश्चात्ताप देत नाही. उलट पुस्तके आपले जीवन आनंदी , सुखी , समाधानी व सुजलाम – सुफलाम करतात.
अशी ही माणसाला सर्वगुणसंपन्न करणारी वाचनाची सवय आपण सर्वांनी लावून घेतलीच पाहिजे.
सर्वांना पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
🚩 धन्यवाद 🚩
