बोध कथा प्रवचने-

लेख




नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे.
खरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार ? सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही ? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ति कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायकामुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो ! मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये ? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे; दुसरी कोणतीच वृत्ति उठता कामा नये; तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये.
समजा, राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत; ते वेगळे करायचे असतील तर त्यांतले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय, त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे, घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे, भगवंताचे अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच. पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की, “तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल.” भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की, बाकीच्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये. भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करुन ते ठेवील, तर कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानसपूजा करून ठेवील, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे, आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.
३४९. अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाण.
मनासारख्या गोष्टी घडत नाही मिळत नाही म्हणून निराश होऊ नको. स्वतःशी नेहमी प्रामाणिक रहा. माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत रहा… मग बघ, तुला माझी प्रचिती येते की नाही जीवनाच्या व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत असेन….

🌹श्री गुरुदेव दत्त🌹

प्रत्येक क्षण आनंदाने जगावा, साऱ्यांमध्ये आनंद वाटावा, संकट आलं तरी दूर होईल, स्वामीमंत्र सदैव मनी जपावा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *