भिवंडी दि.4 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील टेमघर परिसरातील साई बाबा मंदिरा जवळील अरीहंत सिटी कॉम्प्लेक्समध्ये सदनिका खरेदी करतेवेळी दोन विकासकांनी आपसात संगनमत करून सदनिका धारकांना क्लब हाऊस,स्विमिंग पूल अशा प्रकारे हायप्रोफाईल सोसायटीचे स्वप्न दाखवून फसवणूक केल्याने विकासकांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी सदनिका धारकांनी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि शंकर इंदलकर यांना लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनानुसार,२०१८ मध्ये ईमारत डी १ मधील फेज १ मधील सदनिका धारकांना विकासक पारस जैन आणि धरमसिंह मावरा या दोघांनी कॉम्प्लेक्स जवळून मेट्रो लाईन जाणार असून विविध प्रकारच्या सोयी,सुविधा उपलब्ध करण्याचे आमिष दाखवल्याने अनेक जणांनी सदनिका खरेदी केल्या आहेत.परंतु सद्यस्थितीत या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या भिंती खराब झाल्या असून लिकेज सारखे प्रकार घडत आहेत.परंतु याबाबत विकासक अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे.तसेच विकासकांनी इमारतीचे मेंटेनन्स व्यवस्थित ठेवले नसून पाण्याचे टाकीजवळील पत्रे फुटले आहेत.यासह इमारतीमध्ये अस्वच्छता,पाणी प्रश्न,वॉचमनची कमतरता आणि वारंवार मागणी करूनही आजतागायत सदनिका धारकांना सोसायटी करून दिलेली नसल्याचेही रहिवाश्यांनी नमूद करून याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.तर इमारतीत लावण्यात आलेल्या टोरेंट कंपनीच्या विजमीटरचे बिल ऑगस्ट २०२३ पर्यंत ५ लाख ९५ हजार रुपये विकासकांनी न भरल्याने कंपनीचे अधिकारी ३१ ऑक्टोबर रोजी विद्युत प्रवाह खंडित करण्यास आल्याने ही बाब रहिवाशांच्या निदर्शनास आली आहे.दरम्यान सदर इमारतीतील फेज २ मधील रहिवाशी स्वतःमेन्टनंन्स भरत आहेत.परंतु भेदभाव न करता जोपर्यंत विकासक फेज १ मधील रहिवाश्यांना सोसायटी करून देत नाही तोपर्यंत इमारतीचा मेंटनंन्स विकासकांकडून भरण्यात यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे फेज १ मधील वीजमीटरमधून अनधिकृत वीजजोडण्या झाल्या असून त्या खंडित करून फेज १ मधील वीजपुरवठा खंडित झाल्यास इमारतीतील लिफ्ट बंद होऊन आबाल वृद्ध,रुग्ण,लहान मुलांना १२ मजले चढणे अशक्य होणार असल्याने टोरेंट पावर कंपनीला वीज प्रवाह खंडित न करण्याचे निर्देश देवून सदनिका धारकांना दिलासा द्यावा,अशी विनंती रहिवाश्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदनातून केली आहे.
