भिवंडी दि.३१( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शाळा गत ३ वर्षांपासून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जात असल्याने मनविसेने प्रशासनाधिकाऱ्याच्या नेमणुकीसाठी मंगळवारी दुपारी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.निवेदनानुसार,महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ९७ शाळा मागील ३ वर्षांपासून प्रशासनाधिकाऱ्या विनाच सुरू असून यामध्ये ८३५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये २४ हजार विद्यार्थ्यांना प्रशासनाधिकारी नसल्याने शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहावे लागत असून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश, बुट व इतर शैक्षणिक साहित्य वेळेत मिळत नसल्याची बाब मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी ह्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.तर विद्यमान प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून नेमलेले थोरात हे भिवंडी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त पदी कार्यरत असल्याने शिक्षण विभागाची मोठ्या प्रमाणावर फरफट होताना दिसून येत आहे.विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे वार्षिक अर्थसंकल्प ६५ कोटी असतानाही पूर्णवेळ प्रशासनाधिकारी नसल्याने शिक्षण विभागाचा खेळखंडोबा होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.त्यामुळे मनविसेच्या शिष्टमंडळाने आंदोलनाचा ईशारा देत प्रशासनाधिकाऱ्याच्या नेमणूकीसाठी आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी,जिल्हा सचिव हर्षल भोईर, ऍड.सुनील देवरे, उपजिल्हाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा सहसचिव मिलिंद खंडागळे, वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष अफसर खान, कामगार सेना उपचिटणीस दयानंद पाटील, मनसे उपशहराध्यक्ष कुमार पुजारी, उपतालुकाध्यक्ष भावेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
