दसऱ्याला शेजारीच महिलेचे सोने लुटून फरार

भिवंडी


भिवंडी दि.२६ ( गांवकरी TODAY NEWS ) दसऱ्याच्या मुहूर्तावर आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.मात्र एका तरुणाने शेजारील महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या हारासह मंगळसूत्र हिसकावून दाम्पत्यावर चाकू हल्ला करून परिसरातील नागरिकांना चाकूचा धाक दाखवीत धमकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील कामतघर परिसरातून समोर आली आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अभिमन्यू उर्फ मन्या झा असे सोने लुटून फरार झालेल्या आरोपी चोरट्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२४ ऑक्टोबर रोजी मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास प्रमोद पांडुरंग जाधव व त्याची पत्नी दुचाकीचे पूजन करत होते.त्यावेळी त्याच परिसरातील तरुण अभिमन्यूने प्रमोदच्या पत्नीच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या हारासह मंगळसूत्रावर हिसका मारला.त्यानंतर अभिमन्यूने चाकूने पती,पत्नी दाम्पत्यावर हल्ला केला.तसेच त्यास कोणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याने नागरिकांना चाकू हल्ल्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यामुळे भयभीत झालेले नागरिक आपआपल्या घरी गेल्याने अभिमन्यूने घटनास्थळावरून पळ काढला आहे.या चोरीचा अभिमन्यूच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भादंविच्या ३९४ सह मपो ३७(१),१३५ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.पुढील तपास सपोनि व्ही.बी.बढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *