भिवंडी दि.१८ ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी शहर महानगरपालिकेचे माजी महापौर जावेद दळवी यांच्या कार्यकाळात औषध घोटाळ्यात दोषी ठरलेल्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे यासाठी वसीम अहमद खान यांनी भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनानुसार,आरोग्य वैद्यकीय अधिकारी विद्या शेट्टी यांनी २०१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजने अंतर्गत सोडियम धृथपावलोराईड खरेदी औषध घोटाळ्यात स्वतःच्या पदाचा वापर करून औषधे महापालिकेकडे घेतली.परंतु सदर घोटाळ्याच्या चौकशीत स्वतःचा नाव वगळल्याचा आरोप वसीम खान यांनी केला आहे.यासह इंदिरा गांधी परिसरातील आरोग्य केंद्र व लेखा परीक्षण आरोग्य विभागातील औषधे व इतर साहित्यांना लागलेल्या आगीबाबत शेट्टी दोषी आढळल्याने त्यांची २०१८ मध्ये इतरत्र बदली करण्यात आली.मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही.तसेच सद्यस्थितीत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या असतानाही त्या कर्तव्यदक्षता बाळगत नसून कोविड कालावधीतही त्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे.यासह त्यांच्यावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची जबाबदारी असतानाही त्यांनी १० वर्षात एकही शस्त्रक्रिया केली नसल्याचा आरोपही खान यांनी निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.तर २०११ ते २०२० पर्यंत वारंवार नोटीस बाजावूनही लेखापरिक्षणाच्या आक्षेपांची पूर्तताही त्यांनी केली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.दरम्यान स्त्रीरोग तज्ञ पदाच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या पूर्ण होत नसल्याने विद्या शेट्टी यांनी त्या स्वतःपात्र नसल्याचे पत्र तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.खरात यांना दिलेले असतानाही त्यांची एनयूएचएम मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे शासन नियमानुसार कोणत्याही प्रकारचा एनयूएचएम अधिकारी म्हणून पद नसतानाही त्यांची नुकतीच एनयूएचएम अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने याबाबत महापालिका वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे डॉ.शेट्टी यांचा पद वर्ग २ मध्ये असताना त्या वर्ग १ चा पगार घेऊन महापालिका प्रशासनाची फसवणूक करत असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.त्यामुळे सदर सर्व घोटाळ्याची आयुक्तांनी तात्काळ सखोल चौकशी करून डॉ.विद्या शेट्टी यांच्यासह संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी वसीम खान यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
