भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी शहर महापालिकेच्या अधिकृत जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हाशीम अब्दुल वफा खान असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील शांतीनगर परिसरातील उमर कॉम्प्लेक्समध्ये २७ सप्टेंबर रोजी हाशीम खान ह्याने भिवंडी महापालिकेच्या अधिकृत जलवाहिनीवरून इमारतीकरिता १५ अनधिकृतपणे नळ जोडण्या करून महापालिका प्रशासनाची २ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.त्यामुळे उद्धव तुकाराम गावडे यांच्या फिर्यादीवरून ४ ऑक्टोबर रोजी हाशीम खानच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२७,३७९,४३० न्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोना परदेशी करीत आहेत.
