*सर, आज नाही येऊ शकणार हो मी. नवमीचा कुलाचार आहे घरी. वाटल्यास पगार कापा एक दिवसाचा, पण नाहीच जमणार..!*
*वर्षातले काही ठरलेले सण माझी सुटटी असणारच. मी म्हणलोच होतो ना, विनयचं बोलणं साहेबांनी ऐकून घेतले आणि फोन ठेवण्यापूर्वी म्हणाले, “मला तुमचा पत्ता पाठवा मधल्या सुट्टीत जेवायला मीच येतो तुमच्याकडे.”*
*त्याला आश्चर्य वाटलं, सुट्टी न देणारा हा बाबा प्रसाद घ्यायला कसा काय येतोय ? त्याने बायकोला आणि आईला सांगितलं. दोघी म्हणाल्या,” येऊ द्या एक माणूस काही जड नाही आपल्याला आणि असं स्वतःहून कोणीतरी म्हणत आहे, तर जेऊ घालणं हे पुंण्यच ना..!*
*दुपारी धूप, दिप आरती सुरू झाली… आणि साहेब येऊन बसले. सगळे मस्त तल्लीन टाळ, आणि टाळ्या वाजवत पंगत बसली. तशी मोघम ओळख होती घरच्या सगळ्यांसोबत. पहिली वाढ झाली आणि छान साधं वरण भात त्यावर तुप वाढण्यात आलं. विनय आणि त्याचे वडिल देखील होते जेवायला बसलेले. साहेबांनी पहिला घास घेतला आणि अहाहा… असे उदगार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. काही म्हणा काका कुळाचाराच्या वरणभाताची चव अगदी अप्रतिम असते नाही का ?*
*साहेब आहोत असं नातं न राहता अगदी मोकळेपणाने गप्पा झाल्या जेवणं आटोपली. मग सगळेच हॉलमध्ये बसले. साहेबांनी देवीला आणलेली साडी विनयच्या आईला दिली, तेंव्हा विनयची आई म्हणाली, “आहो याची काय गरज,..?” साहेब म्हणाले, असू द्या. आज फार वर्षांनी मला हे कुळाचाराचे जेवण मिळाले. त्या देवीला आपल्याकडून काहीतरी भेट हवीच ना, काकु मला हा कुलाचाराचा वरण भात खुप आवडतो. मला आठवतं माझी आई असाच करायची, पण आई गेली तशी ही चव मिळतच नव्हती. अहो लाखोंचा माझा पगार… पण असा वरणभात नाही खाऊ शकत. घरात होणारे धार्मिक सण आणि हे कुलाचार त्यातली भक्ती आणि ती सात्विकता त्या अन्नात उतरते हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे तेच ह्याचा आनंद जाणो.*
*खरं आहे सर तुमचं, तसं बघितलं तर रोजचाच कुकर, तेच डाळ तांदूळ, आणि करणारे हात पण तेच. पण चव परत रोज ठरवली तरी अशी होत नाही. अहो तुम्ही ज्याला पॉझिटिव्ह माईंड म्हणता ना, ते जरा रोजच्या पेक्षा जास्तच सक्रिय आणि आंनदी असतं बहुतेक. आणि तो आनंद उतरत असेल अन्नात. पण तुम्ही आलात आम्हालाही छान वाटलं, येत जा असेच. तुमच्याकडे नाही का कुलाचार, सणवार…!*
*आई करत होती सगळं… पण दहा वर्षांपूर्वी वारली. बायकोला हे सगळं थोतांड वाटतं. तिने बंद केल्या बऱ्याच प्रथा. मुळात फक्त खरेदी, हिंडणं, फिरणं ह्याच व्याख्या आहेत तिच्या जगण्याच्या. आम्हाला मुलही झालं नाही. मग मी पण फार लादलं नाही. तिला एकदोन वेळा म्हटलं, ह्या कुळाचाराच्या स्वयंपाकाच्या विषयी, तर ती म्हणते सगळं शेवटी पोटासाठीच ना… मग कशाला देवाचं नाव आणि माणसाचं गावं नाही का ?*
*मला हसूं येतं तिच्या बोलण्याचं. वर्षातून कधीतरी फक्त स्वतः आधी खाण्याऐवजी त्या देवाला दाखवून खायचं आहे. रोज तर सगळेच पोटासाठी खातातच ना, पण नाही पटत तिला… मग मी पण सोडून दिलं. त्या दिवशी विनयने सुट्टीचा अर्ज दिला आणि सांगितलं, कुलाचार आहे. म्हणून तेंव्हाच ठरवलं जाऊच आपण. आणि सात्विक मनाने केलेला स्वयंपाक किती माणसं आले, तरी कमी पडत नाही… आई असं नेहमी म्हणायची, म्हणून हिम्मत केलीच येण्याची. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व पण माझं मन खुप दिवसांनी खूप तृप्त झालं बरं का..!*
*विनयचे बाबा म्हणाले, अहो क्षमा कशाची मागता ? येत जा वाटेल तेंव्हा, आम्हालाही छान वाटलं. कोणीतरी आपल्या घरातून तृप्त आशीर्वाद देऊन जातं ह्याला पण भाग्य लागतं..!*
*आज काल लोक पाणी विचारत नाही. खरंतर कोणालाही विन्मुख पाठवू नये, ह्या शिकवणीतले आम्ही,.. आणि विनय व सूनबाईला पण ह्या सगळ्या गोष्टींनी समाधान मिळतं हे पटलं. शेवटी पैसा, यश ह्याच्याही पलीकडे समाधानाची रेष आहे. ती कुणी अध्यात्मातून , कोणी छंदातून कोणी जुन्या परंपरामधून, तर कोणी हिंडण्या फिरण्यातून मिळवतं. माणसं तितक्या वृत्ती. तुम्हाला आवडलं ना इथे येणं… मग येत जा निःशंक मनाने..!*
*साहेब तृप्त मानने बाहेर पडले.*
