भिवंडी दि.२३ ( गांवकरी TODAY NEWS ) शिक्षिकेने विद्यार्थ्याला महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी भिवंडी आरपीआय उपाध्यक्षाने प्राचार्यांसह उपप्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करीत उप प्राचार्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना भिवंडीत घडली आहे.याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्षावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या उपाध्यक्षाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रतिक्षा प्रेमनाथ मिटकर ह्या शिक्षिका आहेत.दरम्यान बीएनएन महाविद्यालयात चौथ्या माळ्यावर नुकतीच कला शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या भूगोल विषयाची परीक्षा सुरू असताना त्या पर्यवेक्षकाचे काम पाहत होत्या.त्यावेळी शिक्षिकेने रुपेश बनसोडे या विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडून सदर बाबीची तक्रार प्राचार्यांकडे करणार असल्याचे शिक्षिकेने विद्यार्थ्याला सांगितले.त्यानंतर रुपेशने वर्गाबाहेर जाऊन थोड्या वेळाने तो आरोपी दादु गायकवाडला सोबत घेऊन आला.याप्रसंगी दादूने शिक्षिकेसह देशपांडे सरांना कॉपी पकडल्याचा जाब विचारत मोठ मोठ्याने ओरडून संबंधित विद्यार्थ्याला पेपर न लिहून दिल्याने शिवीगाळ केली.तसेच पर्यवेक्षक रुपेश पाटील,रसिका घरत, विद्या कांबळे,अनिल लोहार आदी शिक्षकांसह प्राचार्य अशोक वाघ व उपप्राचार्य सुवर्णा रावल यांना शिवीगाळ करीत उपप्राचार्या रावल यांना त्या राहत असलेल्या चरणी पाड्यात जाऊन त्यांचा खून करण्याची धमकी दिली आहे.या धमकी प्रकरणी शिक्षिका प्रतिक्षा मिटकर यांच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्ष दादू गायकवाडच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४४८,५०४,५०६ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मसपोनि वैशाली सरवदे करीत आहेत.
