भिवंडी दि 02 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील वाहन चालकांना शिस्त लागावी आणि वाहतुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहरात वाहतूक विभागांतर्गत सुरु असलेली टोईंग गाडी सावज शोधण्याप्रमाणे केवळ सरकारी व निमसरकारी कार्यालय मार्गावरील व परिसरातील वाहन उचलून धंदा करीत आहे,असा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात असून वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोईंग ठेकेदारावर अंकुश आणावा,अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
शहरातील एस.टी.बस स्थानक ते कल्याण रोड या मार्गावर भिवंडी उपविभागीय अधिकारी ते वाहतूक पोलीस कार्यालय तसेच महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय अशी सरकारी कार्यालये असून या कार्यालयात शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक आपापल्या सरकारी कामासाठी नेहमी येत असतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक आपल्या खाजगी वाहनाने कार्यालयात येतात. मात्र या कार्यालयात खाजगी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांना आपली वाहने रस्त्यावर उभी करणे भाग पडते. या पूर्वी हि वाहने राजीवगांधी उड्डाणपुलाखाली उभी करण्याची सोय होती. मात्र या जागेवर पालिकेने टोरंट पॉवर मार्फत सुशोभीकरण करण्याचे काम सुरु केल्याने नागरिकांना या परिसरात आपली वाहने उभी करण्यास जागा नाही. तहसील आणि पंचायत समितीमध्ये जागा असून देखील त्यांच्या कंपाऊंडमध्ये लावलेली वाहने टोईंग गाडी उचलून घेऊन जात आहे.वास्तविक शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी टोईंग ठेकेदारामार्फत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदाराचे कर्मचारी बेशिस्तपणे वागू लागल्याचे त्यांच्या कारवाईतून वेळोवेळी दिसून येते.त्याचप्रमाणे शहरातील एस.टी.बस स्थानक ते कल्याण रोड हा मार्ग कायम रहदारीचा असून या मार्गावरील रस्त्यावर छोटी-मोठी वाहने पार्क केली जाऊ नयेत.असे असले तरी या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना उभी करण्यासाठी जागेचि उपलब्धता केली पाहिजे. सध्या रिक्षाचे दर वाढल्याने प्रत्येकजण स्वतःचे वाहन घेऊन कार्यालयात येतात. त्यांच्यासाठी शहरात महानगरपालिकेने पार्किंग व्यवस्था केलेली नाही. तर सरकारी कार्यालयाचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील आपल्या मोकळ्या जागेवर पार्किंग झोन बनविलेले नाही. त्याचा गैरफायदा घेत शहरातील टोईंग ठेकेदाराने या मार्गावरील वाहनांना लक्ष्य करीत व्यवसायाची भरभराट काही वाहतूक पोलिसांच्या मदतीने करीत आहे.

नो पार्किंगचे बोर्ड नसेल, वाहतुकीस अडथळा नसेल अशा अनेक जागेवरील वाहने सावज पकडल्याप्रमाणे जप्त करीत आहेत. हि वाहने जप्त करताना दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही,असा आरोप देखील दंड भरलेल्या वाहन मालकांनी केला आहे. मात्र या रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी कार,स्कुल बसेस आणि मोठ्या वाहनांवर टोईंग गाडी वरील पोलीस आणि ठेकेदाराचे कर्मचारी कारवाई करीत नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून या सरकारी कार्यालयाच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि महानगरपालिका प्रशासनाने पार्किंगची सोय केल्याशिवाय कारवाई करू नये,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान वाहतूक विभागाच्या अखत्यारीत चालणारी टोचन व्हॅन मोठ्या वाहनांवर कोणतीही कारवाई करत नाही आणि छोट्या वाहनमालकांचा छळ करीत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली.याबाबत ठाणे वाहतूक विभागाचे डीसीपी विनय कुमार राठोड यांच्याकडे महाराष्ट्र पशु कल्याण कायदा नियंत्रण समितीचे (महाराष्ट्र शासन) उपसमितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तक्रार केली आहे.
भिवंडीत केवळ दुचाकी वाहने उचलण्यासाठी टोईंग वाहन आहे. चारचाकी व तीनचाकी वाहने उचलण्यासाठी लागणारे टोईंग वाहने भिवंडीत उपलब्ध करणार असून देखील कारवाई करण्यात येईल.हि कारवाई सध्या फोटो काढून होत आहे. महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागांना देखील पार्किंगसाठी तात्पुरता जागा उपलब्ध करण्यासाठी सांगणार आहे. भिवंडी शहर वाहतूक विभाग,वरीष्ठ पोलीस निरीक्षक – मनीष पाटील यांनी दिली