निलेश पवार आनगांव. ता.भिवंडी. जि.ठाणे
—————————————-
‘ घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंचच उंच.. जय हिंद, जय भारत या घोषाने
गर्जू दे सारा आसमंत.’
सर्वप्रथम , आजच्या या मंगलदिनी आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला जातो. तसेच देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. आजचा हा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा,अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे.
१५ ऑगस्ट ‘ स्वातंत्र्य दिन ‘ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षं पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीराना यश आले. या दिवशीच पारतंत्र्याचा अंधार संपून स्वातंत्र्याचा नवीन सूर्य उगवला. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकली. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. म्हणूनच १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. परंतु आपल्या भारताला हे स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, चंद्र शेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू , लाला लजपतराय, मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा अनेक महान क्रांतिकारकांनी देशासाठी प्राण पणास लावून स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. त्यांनी खूप हाल – अपेष्टा सहन केल्या म्हणून आजचा हा दिवस आपण पाहत आहोत. आज आपण मुक्तपणे जगत आहोत त्याचे सर्व श्रेय या देश पुत्रांचे आहे. त्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजच्या स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवत आहोत, हे कुणीही विसरता कामा नये.
स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. शेती, विज्ञान, तंत्रज्ञान , आरोग्य व शिक्षण अशा क्षेत्रात आपल्या देशाने नेत्रदिपक प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे . आपल्या देशात विविध जाती – धर्माचे , पंथाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. .भारताचे संविधान संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे.
आपला राष्ट्रीय झेंडा प्रेम, बंधुत्व व ऐक्याचे प्रतीक आहे. हा तिरंगा झेंडा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो. वरचा केशरी रंग बलिदानाचे प्रतीक आहे, मधला पांढरा रंग पावित्रतेचा संदेश देतो आणि हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मधे असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतीक आहे. असा तिरंगा झेंडा आपल्यात नवी ऊर्जा व प्रेरणा निर्माण करतो.
‘ उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांपुढे
ज्यांनी भारत देश घडवला. ‘
आजचा हा दिवस म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे.
आज स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना मन अभिमानाने भरून येते आहे.
खरंच, आपले हे सौभाग्य आहे की, आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्म घेतला.
‘ गुंज रहा है दुनिया में
हिंदुस्थान का नारा
चमक रहा है आसमान मे
तिरंगा हमारा.’
आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्व राष्ट्रध्वजाला वंदन करुया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया.
शेवटी, प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांनी देशभक्तीपर लिहिलेल्या गीताच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही.
‘ सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्थान हमारा.’
लेख ::निलेश पवार
अनगाव , ता – भिवंडी , जि ठाणे.
🚩 जय हिंद , जय भारत 🚩
