बोध कथा , “बाप मनाची आई”!

लेख



लेख: जागृती सारंग

*गेल्याच वर्षी तिच्या लग्नाला २० वर्षे झाली. आणि तिचा नवरा तीच्याकडे पुन्हा आला. उरलेलं आयुष्य एकत्र संसार करुन घालवण्यासाठी.*

*लग्ना नंतर तीन वर्ष कशी बशी ती त्याच्यासोबत राहीली होती. तीसऱ्या वर्षी दोघांना एक गोड मुलगा झाला होता. पण तो जन्माला आला आणि ती त्याला घेऊन घर सोडुन बाहेर पडली.*

*या सगळ्यासाठी कारणं बरीच होती, पण त्यात कहर म्हणजे हा की त्याचे आई-वडील, भाऊ-बहिण, मामा-मावशी, हे सर्व त्याचे जीवलग नातलग जे सांगतील तीच पूर्व दिशा!*


*तीनं त्याच्या सुखासाठी कितीही जीव ओतला, तरी त्याच्यासाठी त्यात विशेष असं काहीच नसे. तीने संसार मोडू नये म्हणुन बऱ्यचदा चुक नसतानाही दर वेळी नमतं घेतलं. पण त्याचा परिणाम असा झाला कि, तुझंच चुकतंय म्हणुन तर तू नमतं घेतेस. आणि या सर्वाचा उबग येऊन मनाशी पक्क करुन तीनं ते घर आणि त्याला सोडलं ते कायमचं.*

*त्यानंही त्याच्या जीवलगांच्या सांगण्यावरुन तीच्याशी कधी संपर्क केला नाही की, कधी लेकराची विचारपुस सुद्धा केली नाही. त्याच्या जीवलगांनी त्याला सांगुन ठेवलं होतं की, ती एक स्त्री आहे ती तुझ्याशीवाय काहीच करु शकणार नाही, ती तुझ्याच पायाशी लोळण घालत येणार.*



*पण त्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती कि, ती एक मानीनी होती. श्रीकृष्णानेही शिशुपालाच्या १०० चुका माफ केल्या होत्या, पण १०१ व्या चुकिला माफ न करता त्याचा वध केला. त्याचप्रमाणे तीनेही ३ वर्षे नेहमी नमते घेत काढली होती. पण जेव्हा घर सोडलं, तेव्हा पुन्हा माघारी न फिरण्याचा पण च करुन ती निघाली होती.*

*मुंबईत लहानाची मोठी झाल्याने, शिक्षण जोडीला असल्याने तीने स्वत:च्या पायावर उभं रहायचं ठरवलं. मावशीच्या घराजवळच तीने स्वत:च एक भाड्याने घर घेतलं आणि तीथे आपल्या लेकरासोबत राहू लागली. नोकरीला जाताना बाळाला तीच्या मावशीकडे सोडुन जाऊ लागली. बाळ वर्षाचं असताना ईतकं आजारी पडलं कि तीनं त्याला अक्षरक्ष: मृत्युच्या दारातून ओढुन परत आणलं. हि बातमी तीच्या मावशीनं तीच्या नकळत त्याच्यापर्यंत पोहोचवली तरीहि त्याने त्याचा ताठरपणा त्या ईवल्याशा लेकरासाठी सुद्धा सोडला नाही.*

*जसं जसं लेकरु मोठं होत गेलं, तशी ती सुद्धा अजुन जास्त खंबीर होत गेली. लेकरालाही आईची धडपड, त्याच्यासाठी चाललेले तीचे कष्ट सारं सारं काही दिसत होतं. ५ वर्षांचा असताना एकदाच त्यानं तीला अगदी तगादा लावुन विचारलं होतं कि आई ईतरांचे बाबा आहेत तसे माझे बाबा कुठेत? तेव्हा तीने त्याला समोर बसवुन तीची सर्व सत्य कहाणी त्याला ऐकवली. तेव्हापासुन त्यानं पुन्हा कधी बापाचं नाव देखील काढलं नाही.*

*लेकराचं सर्व शिक्षण तीने त्याला त्याच्या मनाप्रमाणे करु दिलं. त्याला आता तीने परदेशात पाठवलंय पुढल्या शिक्षणासाठी. तीचा नवरा या सर्वाची नोंद घेऊन असायचा पण कधी स्वत:हुन एकदाही तिला कधी फोन केला नाही का मेसेज नाही.*

*पण गेल्या २ महिन्यांपूर्वी तो तीच्या दारात उभा ठाकला आणि सगळ्या चुकांचा पश्चाताप करुन माफि मागु लागला. कारण ६ महिन्यांपूर्वीच आई-वडील लागोपाठ वैकुंठवासास निघुन गेले आणि भाऊ-भावजयीने किंमत देणे कमी केले तसं त्याला बायको मुलाची आठवण आली होती. पण तीनं मात्र मनात असताना सुद्धा जरासुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला नाही. कारण गेली २० वर्षे तीने कसे घाव सोसत काढली हे सर्व तीच्या डोळ्यांसमोर तराळलं. त्याच्यासमोरच तीनं लेकराला परदेशात फोन लावला आणि त्याला त्याचं मत विचारलं कि तुझ्या बाबाला आता तू आणि तुझी आई हवीय!*

*मुलानं क्षणाचाही विलंब न लावता सांगीतलं, आई, “तुच माझी आई आणि तुच माझे बाबा”. तीनं फोन स्पिकरवरच ठेवला होता. फोनसोबत तीनं दारसुद्धा बंद केलं आणि तो मात्र बराच वेळ तीच्या दारात थांबुन आसवं गाळुन परतुन गेला.*

*खरंच… समाजात अशा किती तरी स्त्रिया आहेत ज्यांच्या पतीने साथ सोडलीय जीवंतपणी किंवा मृत्युमुळे, किंवा सोबत असुन ही नसल्यासारखे!अशा सर्वच स्त्रिया आई सोबतच बाबाची सुद्धा भुमिका बजावतायत!*
*सलाम त्या सर्व मातांना!*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *