भिवंडी गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतेक ठिकाणी रस्त्यावर पडलेला आणि कचरा कुंडीत जमा झालेला कचरा वेळीच न उचलल्याने ठिकठिकाणी ढीग साचले आहेत.त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मात्र कल्याणरोड घुंघटनगर या परिसरातील काही महिला आणि अल्पवयीन मुलांनी कचऱ्याने भरलेली कचराकुंडी (पालिकेची डस्बीन) रस्त्यावर आणून टाकली. त्यामुळे घुंगटनगर ते रामेश्वर मंदिर भागात बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.शहरातील कल्याणरोड भागात काही ठिकाणी घंटागाडी येते परंतु घुंगट नगर भागातील मोहल्ल्यात गेल्या दोन महिन्यापासून नियमित घंटागाडी येत नाही. त्यामुळे रस्त्यावर साठलेला कचरा रस्त्यावर आला आहे. तर पालिकेने दिलेल्या प्लास्टिक कचरा कुंडी(डस्बीन) देखील भरून जाण्यायेण्याच्या मार्गावर कचरा साचून परिसरात दुर्गंधी पसरली होती. तर नागरिकांना कचऱ्यामधून चालावे लागत होते,असा आरोप एका महिलेने करून याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष्य जावे या करिता परिसरातील महिलांनी अल्पवयीन मुलांच्या मदतीने डस्बीन भरलेला कचरा कल्याणरोड येथील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर आणून टाकला. या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरली होती.डस्बीन रस्त्यावर असल्याने वाहने रस्त्यावर ठप्प झाली. सतत तीन दिवस नियमित मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास विश्रांती घेतल्याचा फायदा उठवीत हे उस्फुर्त आंदोलन रस्त्यावर झाले. वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच जवळच असलेल्या शहर वाहतूक पोलीस कार्यालयातून पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले आणि त्यांनी रस्त्यामध्ये ठेवलेले पालिकेचे डस्बीन हटवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. वास्तविक शहरातील जवळजवळ सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसून ऐन पावसाळ्यात दुर्गंधी पसरली आहे. हि वस्तुस्थिती अनेक माजी नगरसेवक आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांना माहिती असूनदेखील ते का तोंडात मूग गिळून बसले आहे,असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. बिरो रिपोट अनिल गजरे भिवंडी
