समता विचार प्रसारक संस्था वतीने वंचितांच्या रंगमंचावर प्रेमाच्या महतीवर प्रभावी नाटिका सादर..

ठाणे



आज कधी नव्हे इतकी साने गुरुजींच्या विचारांना समजून घेत त्याप्रमाणे आचरणातून गरज असतांना नाट्य जल्लोष खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेया थीमवर इतक्या प्रभावी नाटिका सादर करून गुरुंजीच्या या लहानपणापासून ऐकत आलेल्या प्रार्थनेशी अधीक जवळीक निर्माण केली. यासाठी कलाकार – कार्यकर्त्यांनी जो अभ्यास केला, मेहनत घेतली ती सवय कधी घालवू नका! आपल्या भावना व विचारांच्या प्रभावी अभिव्यक्तीतून समाज प्रबोधनाचे हे अजोड काम निरंतर चालु ठेवा, अशा शब्दात नाट्य- चित्रपट -जाहिरात क्षेत्रातील – कलाकार दिप्ती दांडेकर यांनी वंचितांचा रंगमंच उपक्रमाचे कौतुक केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ठाण्यात दादा कोंडके अँफी थिएटर येथे रविवार ११ जून ला साने गुरुजींच्या ७३ व्या स्मृती दिनी आयोजित नवव्या युवानाट्यजल्लोष अर्थात वंचितांचा रंगमंच कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संयोजका हर्षदा बोरकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ होते. “रत्नाकर मतकरींच्याच प्रशिक्षणा मी तयार झाले असल्याने, मतकरी सरांना लावलेल्या या आगळ्यावेगळ्या रोपट्याचे महत्व मी जाणते व यासाठी लागेल ती मदत मी करत राहीन असा निर्धारही त्यांनी पुढे व्यक्त केला.



जेष्ठ रेडीओ जॉकी, मुलाखतकार, आराशवाणी कलाकार व प्रशिक्षक गणेश आचवल यांनी प्रथम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट श्यामची आई, वसंत देसाईंचे सेनानी साने गुरुजी या चित्रपटांची आठवण जागवत, आजच्या नाट्यजल्लेष मध्ये सादर झालेल्या नाटिकांनी हे काम पुढे चालू ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आवाजाचा योग्य वापर, माईकचा प्रभावी वापर आदी तांत्रिक बाबींवरही त्यांनीमोलाचे मार्गदर्शन केले व खरा तो एकची धर्म या संकल्पनांवर एक उस्फूर्तसादरीकरण करत सर्वांची मने जिंकली.



सुरुवातीला साने गुरुजींच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्षा हर्षलता कदम, श्रमिक जनता संघ चे महासचिव जगदीश खैरालिया ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, ठाणे शहरातील सावरकर नगर, किसन नगर, लोकमान्यनगर, मानपाडा, कशेळी, रमाबाई आंबेडकर नगर, मनोरमा नगर, येऊर आदिवस्तीतील मुलांच्या उत्साही सहभागाने जल्लोषात सादरीकरण झाले. प्रत्येक वस्तीतील मुलांनी आपल्या विचाराने व विविध प्रकारे “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ह्या थीम वर नाटिका सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले व डोक्यात विचारांची पेरणी केली. सावरकर नगरातील मुलांनी ओळख ह्या विषयावर जेव्हा एका कचरा वेचणाऱ्या सफाई कामगाराला आपण उद्धटपणे बोलतो व हे पहाणारी त्यांची मुलगी नंतर एक आयएएस अधिकारी झाल्यावर ही चूक करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालते हे आपण पाहतो तेव्हा आपोआप उमगतं चूक कशी सुधारावी ! “वडील रस्त्यावरील कचऱ्याचे साफसफाई करतात मी अधिकारी होऊन भ्रष्टाचाराची साफसफाई करीत आहे” या निर्धाराने टाळ्या मिळवल्या. रमाबाई आंबेडकर नगर येथील मुलांनी माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं ह्यावर अप्रतिम अशी नाटिका सादर करून प्रत्येकाच्या मनात घर केले. सध्या परिस्थिती बघता प्रत्येकाच्या मनात द्वेष, मोठेपणा चा वृथा अहंकार, दुसऱ्याबद्दल अनादर, समजून न घेणे अशा प्रवृत्ती आपल्याला दिसतात पण आपण प्रत्येक लहानथोर माणसाशी माणसाप्रमाणे वागलो तर हे सर्व द्वेष निघून जातील व सर्वजण एकात्मतेनी राहतील ह्याचे उत्तम उदाहरण त्यांनी नाटिकेच्या माध्यमातून दाखवले. लोकमान्य नगर विभागातील मुलांनी रुममेट ह्या विषयावर नाटिका सादर केली. कॉलेज हॉस्टेल वरील दोन विध्यार्थ्यां मधील विसंवाद व नंतर साने गुरजींची शिकवण आचरून निर्माण केलेले प्रेमबंध ह्यांवर ही नाटिका होती. मानपाडाविभागातील मुलांनी आई ह्या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. जीवनातील आईचे महत्व किती आहे व आपल्यासाठी आई किती धडपडत असते व आपल्याला काय करावं लागतं ह्याचं मन हेलावणारं दर्शन त्यात दाखवले. मनोरमा नगर विभागातील मुलांनी आम्ही चार ह्या विषयावर नाटिका सादर केली. लोकं प्रत्येक वेळेस आपल्याला चार लोकं काय म्हणतील असं म्हणत कसं चुकीचं वागतात ह्यावर अत्यंत विनोदी व उपरोधिक शैलीत हे सादरीकरण करण्यात आले. कशेळी गटाने बापमाणूस ही नाटिका सादर केली. बाप हा कष्ट करीत असतो त्यावर मात करीत असतो. व त्याला आलेल्या अडचणी मुलाला कधी येऊ नये म्हणून तो आगोदरच तयारीत असतो. पण मुलगा आपल्या मित्रांच्या नादी लागून आपल्या वडीलांची संपत्ती फुंकून टाकतो. अशावेळी एकमेकांशी वैर नाही तर सहकार्याने व सामाजिक ऋण मानत काम केले तर हिताचे ठरेल, असा संदेश यात दिला होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही किसन नगर गटातील मुलांनी आगळीवेगळी गुरूजी ही नाटिका सादर केली. साने गुरुजींनी आपल्या आयुष्यात जन सामान्यांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व त्यातून आपल्या व समाजातील प्रत्येक हक्कासाठी लढा उभारत ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन आपले हक्क आपले अधिकार व विठ्ठल दर्शनासाठी उपोषण करतात व लढतात हे ह्या नाटिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे दाखवण्यात आले.

हया कार्यक्रमाला जिज्ञासा ट्रस्ट चे सुरेंद्र दिघे, पाणी फाऊंडेशन चे प्रसाद सहस्त्रबुद्धेतसेच टॅग संस्थेचे सुनीता फडके, शुभांगी सबनीस आदी साथी उपस्थित होते. ओंकार जंगम, स्मिता मोरे, प्रीती वर्मा, येनोक कोलियार, मयूर बने, सुशांत जगताप, दीपक व साक्षी वाडेकर, राहूल व वैभव गोरीवले, ओम गायकवाड, आदर्श उबाळे आदी एकलव्य कलाकारांनी या नाटिका सादर केल्या. सुनिल दिवेकर, अजय भोसले, निलेश दंत यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *