भिवंडी दि.९( अनिल गजरे ) शहरातील मौजे पिंपळास येथील शेतकऱ्यांच्या बनावट दस्तावेजाने बनावट कुलममुखत्यार बनवून जमिनीची रजिस्ट्री करून बिल्डरसह दोघांनी जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून पीडित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा उप विभागीय कार्यालयासमोर उपोषण किंवा तीव्र आंदोलनाचा ईशारा भूमिपुत्र पार्टी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत संभाजी मोटे यांनी उप विभागीय अधिकारी अमित सानप यांना शुक्रवारी प्रांत कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनानुसार,रखमा अनंत पाटील,प्राप्ती बाळू पाटील,काशिनाथ पताळे, शिवाजी पताळे आदी शेतकरी सारंगगाव येथे राहत असून त्यांच्या मालकीची मौजे पिंपळास हद्दीत सर्व्हे नं.१५९/३५,३२,२७,१६२/२,१६१/७ ईतकी जमीन आहे.दरम्यान १७ जानेवारी २००७ ते २२ मे २००८ या कालावधीत मे.जलाराम डेव्हलपर्स भागीदार मोहनलाल राघव खेतिया व त्यांचे स्थानिक रहिवाशी साथीदार महेश दशरथ पाटील या दोघांनी आपसात संगणमत करून बनावट सह्या व अंगठे घेऊन त्या आधारे फेरफार क्र.३६८ नोंदवून जमिनीचे ७/१२ दप्तरी बेकायदेशीरपणे नावांची नोंद करून सदर जमीन हडप केली आहे.तसेच पीडित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही.

त्यामुळे वरील शेतकऱ्यांची घोर आर्थिक फसवणूक झाल्याने अनधिकृतपणे जमीन हडपणाऱ्या संबंधित बिल्डरसह स्थानिकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा,अन्यथा भूमीपुत्र पार्टी उप विभागीय कार्यालयासमोर बसून उपोषण किंवा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा भूमीपुत्र पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी निवेदनातून दिला आहे.