आई एक महान दैवत..

लेख


……..।।।।।।।।।……………….

आज 14 मे , Mother’s Day म्हणजेच मातृदिन आहे. दरवर्षी मातांचा सन्मान करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा उत्सव साजरा केला जातो. आईबद्दल आदर आपुलकी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे मातृदिवस. त्या निमित्ताने आईची महती सांगणारा हा लेख.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृ देवो भव ‘ असे म्हणून आईला सर्वात वरचे स्थान दिले गेले आहे. आपल्याकडे नेहमीच आईला वंदनीय आणि पूजनीय मानले गेले आहे .आई या दोन शब्दांचा अर्थ – ‘ आ ‘ म्हणजे आकाशाएवढे प्रचंड मोठे मन असलेली आणि ‘ ई ‘ म्हणजे ईश्वराएवढी देवतुल्य असलेली ती असते आई. आई या दोन शब्दात माधुर्याचा सागर भरलेला आहे. आई हा शब्द उच्चारताच प्रेम माया ममता आत्मीयता आणि जिव्हाळा या भावना डोळ्यासमोर उभ्या राहतात. म्हणूनच म्हटले जाते – प्रेमस्वरूप आई……. वात्सल्यसिंधू आई.


मला तर वाटते की , आई हा जगातील सर्वात मोठा शब्द आहे . या शब्दामध्ये जो ओलावा आहे तो इतर कुठल्याच शब्दात नाही. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी म्हणतात, ‘मातेचे स्नेह ते नैसर्गिक ‘.
मातेच्या प्रेमात कुठलाच कृत्रिमपणा नसतो. तिच्या प्रेमाला खोटेपणाचा आणि स्वार्थाचा लवलेशही नसतो. अतिशय खरे, निःस्वार्थ आणि निरलस असे तिचे प्रेम असते. आईच्या प्रेमाला कशाचीच सर येऊ शकत नाही. अगदी कुबेराचा खजिनासुद्धा तिच्या प्रेमापुढे दरिद्रीच राहील. आईने दिलेल्या संस्कारावरच मुलाच्या आयुष्याची इमारत उभी राहते. आजचे जग घडवले ते अनेक थोर लोकांनी. पण त्या थोर लोकांना घडवणारी त्यांची आई होती. छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी या महापुरुषांच्या मागे त्यांच्या मातांनी दिलेली उज्वल शिकवण आणि संस्कार उभे होते. म्हणून तर कवी म्हणतो, ‘ आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.’
आई नावाचे एक अजब रसायन आपल्या घरात असते. आई मायेच्या पंखाखाली अख्खं घर सावरून घेते आणि घराचं घरपणदेखील तीच टिकवते. खरं तर आईमुळेच घरात जिवंतपणा जाणवतो. ती मुलांसाठी आणि घरासाठी चंदनाप्रमाणे दिवस – रात्र झिजते. कुटुंबासाठी आईचा त्याग असिमित असतो.
‘ दुसऱ्यांसाठी ती राबते
स्वतःसाठी कधी जगत नाही,
जगात आईच अशी असते
जिला स्वार्थ कधी कळत नाही ‘.
म्हणूनच विनोबा भावे म्हणायचे, ‘निष्काम कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे आई ‘.
आई ही पृथ्वीमोलाची असते. आपल्या जीवनात आईचे मोल अनमोल असते. आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. ते शंभर जन्म घेऊनही फिटू शकत नाहीत. आईच्या उपकारांची , तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे कधीच शक्य नसते. जगातील प्रत्येक कर्ज फेडता येईल, पण मातृत्वाच्या ऋणातून कोणीच मुक्त होऊ शकत नाही. एका चित्रपटात सुनील दत्त यांच्या तोंडी असे वाक्य आहे, ‘ बाप की जगह मां ले सकती है, लेकीन मां की जगह बाप नाही ले सकता!’ खरंच आईची थोरवी आणि महिमा शब्दातीत आहे.
आईबद्दल आदर, आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा मंगल दिवस आहे. आज मातृदिनाच्या निमित्ताने जगातील सर्व मातांना मनपूर्वक शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम.
लेखक – निलेश पवार
अनगाव , ता – भिवंडी, जि – ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *