भिवंडी प्रांत कार्यालयात दुसरा गोसावी तर नाही ना?

भिवंडी

मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला न देता विना संमतीने जागेमध्ये खोदकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी

भिवंडी दि.१८(प्रतिनिधी):- मुंबई वडोदरा दृतगती महामार्ग प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भूमिहीन करून महामार्ग बनविणार आहेत कि काय? असा प्रश्न सध्या आ वासून उभा असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी वरून दिसून येत आहे,
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड पाटील या शेतकऱ्याच्या जमिन सर्व्हे नं.६६/७ अ क्षेत्र ६० आर -०० प्रति यापैकी सुमारे ०-५९-१० इतकी जमीन प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. दरम्यान विष्णू पाटील यांना या क्षेत्रापैकी ०-४८-६३ क्षेत्राचा मोबदला ऑगस्ट २०२० मध्ये मिळाला असून उर्वरित ०-१०-४७ क्षेत्राचा मोबदला मिळणे प्रलंबित आहे. तसेच या संपादित जमिनीतील एकूण 103 झाडांचा मोबदलाही मिळालेला नाही. त्यामुळे विष्णू पाटील यांनी 2021 मध्ये उपविभागीय कार्यालयात अर्ज दिला होता. परंतु असे असतानाही विष्णू पाटील आणि त्यांची मुलगी अश्विनी पाटील यांनी वारंवार उपविभागीय कार्यालयात हेलपाटे मारूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही.

तसेच सदर मोबदल्या बाबत उपविभागीय कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोपही विष्णू पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारी अर्जात केला आहे.
तसेच विष्णू पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही उपविभागीय अधिकारी कार्यालयातून कोणत्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. अशातच दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास विष्णु पाटील यांच्या सर्व्हे नं.56/4 पै/ब मालकीच्या संपादीत जमिनीवर नायब तहसीलदार आदेश म्हात्रे व महामार्ग यंत्रणा अधिकारी यादव हे पोलीस बंदोबस्ता सह जेसीबी घेऊन येऊन जागेत बेकायदा अतिक्रमण करून सुमारे 8 ते 10 झाडे बळजबरीने उन्मळून पाडलेली आहेत.


सदरची घटना माहिती पडताच विष्णू पाटील व त्यांची मुलगी अश्विनी पाटील हे घटनास्थळी गेले व त्यांनी संबंधिताना विचारणा केली कि कोणाच्या आदेशाने हे काम करीत आहेत, त्यावेळी नायब तहसीलदार आदेश म्हात्रे म्हणाले कि, तुम्ही 60 झाडांचे पैसे (मोबदला) घेतले आहेत, आणि आता तुम्ही झाडे तोडण्यास मनाई करता? त्यावेळी अर्जदार यांनी विचारले कि झाडांचे पैसे घेतल्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे तो दाखवा, कशाच्या आधारे तुम्ही हे अतिक्रमण करून नासधूस करतायेत, त्यावर म्हात्रे म्हणाले कि, काम काही बंद होणार नाही, तुम्हाला कोणाला कॉल लावायचा तो लावा, आम्ही ही झाडे काढून टाकणारच,
सदरचा प्रकार हा महामार्ग यंत्रणा प्रतिनिधी यादव यांचे समोर घडलेला आहे, या दोन्ही लोकसेवकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व प्रकरणाची योग्य ती शहानिशा न करून शेतकरी विष्णू पाटील यांचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे, म्हणून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच याच जागे लगत एका कंपनीने अतिक्रमण करून वाढीव खोदकाम केले आहे. सदर कंपनीने कोणतीही नोटीस न बजावता अनधिकृतपणे पोलिसांच्या फौजफाट्यासह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी १५ ते १८ फूट उंचीचे खोदकाम करून सुमारे ८ ते १० हजार ब्रास भराव मुरूमाचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अश्विनी पाटील ह्या घटनास्थळी दाखल झाल्या असता त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

त्यावेळी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सकारात्मक उत्तर दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे अश्विनी पाटील यांना आपल्या जमिनीबाबत काहीतरी काळेबेरे होत असल्याचा संशय आल्यामुळे त्यानी पुन्हा उपविभागीय अधिकारी भिवंडी यांना लेखी तक्रार देऊन संपादित जागेतील संपूर्ण क्षेत्रातील झाडांचा मोबदला दिलेला नसताना महसूल अधिकारी आदेश म्हात्रे (नायब तहसीलदार) व महामार्ग यंत्रणा अधिकारी यादव यांनी बेकायदेशीर पणे पोलीस संरक्षणात आमच्या मालकीतील बाधित झाडांची विना परवाना अतिक्रमण करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने झाडे पाडली म्हणून या दोघांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, या जमिनीव्यतिरिक्त दुसरी जमीन नसल्याने पाटील हे भूमिहीन होणार असून शासकीय मोबदला मिळाला नसल्याने त्यांचेवर खूप मोठा अन्याय झाला आहे, जमीन संपादीत होऊनही मोबदला मिळत नाही व जमीन मालकांच्या विना परवानगीने झाडांची राजरोसपणे कट्टल करून पर्यावरणाचा ऱ्हास चालवीला असल्यामुळे भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दुसरा गोसावी तर निर्माण झाला नाही ना? अशा चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे भविष्यात सदर जमिनीची नासधूस होणार असून संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी अश्विनी पाटील यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *