प्रभाग अधिकारी मेहेरबान, तर मंडप ठेकेदार पहिलवान,मनपा हॉल मध्ये सामान ठेवणाऱ्या मंडप धारकांवर कारवाई करण्याची मुंडे यांची मागणी

भिवंडी


उपायुक्त कर यांनी दिलेल्या कारवाईचे आदेशाला प्रभाग अधिकाऱ्यांनी दावली केराची टोपली
भिवंडी ( गांवकरी TODAY NEWS ):- भिवंडी महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्यावर कोणतेही कार्य होऊ नये व इतर नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून भिवंडी मनपाने कम्युनिटी हॉलचे बांधकाम केलेले आहे परंतु आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणी प्रमाणे मंडप ठेकेदार हे त्या हॉल मध्ये असलेल्या कार्यक्रमासाठी लागणारे मंडप चे सर्व साहित्य हे महानगर पालिकेला कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता विनामूल्य ठेवत असल्याने महानगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे अशा मंडप मालकांवर कारवाई करण्याची मागणी मुरलीधर मुंडे यांनी मनपा आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
मुंडे यांनी आपल्या तक्रारी निवेदनमध्ये नमूद केले आहे कि, भिवंडी शहरात प्रभाग समिती क्र. 1 ते 5 मध्ये अनेक ताडपत्री मंडप लग्नाचे हॉल आहेत, ते हॉल मालक कोणत्याही प्रकारचा टॅक्स महानगर पालिकेकडे भरणा करत नाहीत, ते विना परवाना हॉल चालवत असल्यामुळे ते बेकायदेशीर आहेत, याबाबत मुंडे यांनी अनेक तक्रारी करुनसुद्धा प्रभाग अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत अथवा माहिती सुद्धा देत नाहीत, त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे,
मुंढे यांनी पुढे आपल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे कि, आपल्या महानगर पालिकेचे लग्नाचे 23 हॉल आहेत, काही हॉलवर मंडप वाल्यांनी कोणत्याही प्रकारची मनपा प्रशासनाची परवानगी न घेता हॉलमध्ये मंडप, खुर्ची, लाईट, टेबल व इतर साहित्य ठेवले असून ते महानगर पालिकेची वीज व पाणी फुकट वापरतात तसेच त्यांचे कामगारही या हॉलमध्येच राहतात, याबाबत अनेक तक्रारी देऊनसुद्धा प्रभाग अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप मुंडे यांनी केला असून जर मंडप वाले धंदा करून साहित्य देण्याचे पैसे नागरिकांकडून घेउनसुद्धा महानगर पालिकेला टॅक्स देत नाहीत मग झोपडपट्टी धारकांकडून टॅक्स घेण्याऐवजी झोपडपट्टी धारकांचा टॅक्स का माफ केला जात नाही? असा खोचक सवाल मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी एक विशेष बाब निवेदनामध्ये नमूद केली आहे ती म्हणजे ताडपत्री हॉल मध्ये मागे आग लागली होती, ती आग महानगर पालिकेलाच विझवावी लागली, मनुष्य हानी झाली नाही अन्यथा महानगर पालिकेकडून मयतांच्या वारसाना भरपाई द्यावी लागली असती म्हणून भविष्यात असे प्रकार घडून येऊ नयेत म्हणून त्यांचेवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच मनपाचे हॉल हे ठेक्याने देऊन मनपाचा आर्थिक फायदा करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.
मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन कर विभागाचे उपायुक्त यांनी दिनांक 30/01/2023 रोजी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना लेखी आदेश देऊन आपल्या प्रभागातील हॉल मध्ये कोणत्याही खाजगी व बाहेरील व्यक्ती यांनी मंडप, खुर्च्या, टेबल, लाईट, सामान ठेवले असेल किंवा ठेवत असेल तर आपल्या प्रभागामार्फत सर्व सामान काढण्यात यावे व संबंधित व्यक्ती वर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आमचे कार्यालयाकडे त्वरित सादर करण्यात यावे अशा आशयाचे पत्र देऊनसुद्धा आजपावेतो कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, याबाबत आमच्या प्रतिनिधिनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले कि, काही मनपाचेच कर्मचारी मंडप ठेकेदार बनून त्यांनीच विनामूल्य कब्जा हॉल वर केलेला आहे ते प्रभाग अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंधित असल्यामुळे प्रभाग अधिकारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास धजावत नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे उपायुक्त कर हे त्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे मुंडे यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *