सावित्री म्हणून जगता यावं असा दिला संदेश
—————————————-
जिल्हा परिषद ठाणे
महिला व बाल विकास विभागा तर्फे पुरस्कार व कार्यशाळा सन २०२२-२३ चे भव्य आयोजन ठाणे भवन येथे करण्यात आले होते.
दि. २८/०३/२०२३ रोजी सकाळी ११ दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास श्री. संजय बागुल यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. तर आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा पुरस्कार सोहळा पार पडला.
महिला व बाल विकास विभाग प्रमुख यांनी प्रास्ताविक करताना महिलांनी गाव पातळीवर उत्तमरित्या काम केलेच आहे पण वेगवेगळ्या योजना राबवत अनेक समस्यांना सामोरे जात काम केलं आहे.
आज त्यांचा सन्मान करतांना आम्हाला आनंद होत आहे असेच पुरस्कार सोहळा पुढील वर्षी सुद्धा करु. अशी भावना व्यक्त केली.
थियेटर ऑफ रेलेवंस यांच्या तर्फे लोक-शास्त्र सावित्री मराठी नाटक सादरीकरण केले. जगण्यात सावित्री असावी असा संदेश नाटकाद्वारे महिलांना दिला गेला.
जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी महिलांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत गाव पातळीवर जोमाने काम करणाऱ्या महिलांचे पुरस्कार सोहळ्यात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुनिल जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. गंगाधर परगे, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका उपस्थित होते.तर
पर्यवेक्षिका यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांनी सन्मान चिन्ह व १० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या कु. डॉली पाटील यांना सन्मान चिन्ह व २० हजार रूपयांचे धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
जागतिक पातळीवर तुमच्या कामाची दखल घेतली जाते तुम्ही उत्तम काम करताय. वैवाहिक जिवनात स्वतःसाठी वेळ देण अवघड असलं तरी दर दिवसातील एक तास स्वतःसाठी द्या. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या अंगणवाडीतील लहान मुलांना मानसिक व शारीरिक सुदृढ करणे गरजेचे आहे. येत्या काळात ० ते ७ वयोगटातील मुली व मुलांसाठी आपण वजन त्योहार उपक्रम राबवणार आहोत. त्यासाठी तुम्ही सज्ज होऊन काम करावे. पुढील वर्षात आपल्या ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात आपण पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले केले.
पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर आपण सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करतोय आणि या कामासाठी दिलेला पुरस्कार आहे व आपल्या कामाचा सोहळा आहे. आज सन्मानित केल्याबद्दल आभार मानते अशी भावना भिवंडीच्या पर्यवेक्षिका श्रीम. सुलभा दिनेश अडसुळे यांनी व्यक्त केले.
*चला स्वतःसाठी जगूया* आहाराची काळजी घ्या, दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी, आर्थिक साक्षरता तसेच बचत, छंद जोपासा असे काही महत्त्वाच्या टिप्स महिलांना अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. रुपाली सातपुते यांनी सांगितले.
सावित्री म्हणून काम करता यावं म्हणून आपल्याला व्यवसाय किंवा नोकरी करुन स्वावलंबी होणं गरजेचं आहे असे प्रकल्प संचालक यांनी सांगितले.
अशी माहिती जनसंपर्क अधिकारी
जिल्हा परिषद ठाणे रेश्मा आरोटे यांनी दिली
