माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन
भिवंडी, दि. ४ (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपाच्या विस्तारासाठी मंडल अध्यक्षांनी कार्य करावे, असे आवाहन भाजपाचे नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले.
भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण मधील दक्षिण मंडलचे अध्यक्ष श्रीधर पाटील, उत्तर मंडलचे अध्यक्ष निलेश गुरव आणि पूर्व मंडलचे अध्यक्ष श्रीकांत गायकर यांचा पदग्रहण सोहळा आज पार पडला. भाजपाचे नेते कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडल अध्यक्षांनी पदाची सूत्रे स्वीकारली. राहनाळ येथील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी हरिश्चंद्र भोईर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रेया गायकर, सपना भोईर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंत पाटील, देवेश पाटील, शांताराम पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती रवीना जाधव, ललिता पाटील, स्नेहा पाटील, सरपंच प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
देशात भाजपा हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. आपल्या भागातही मंडल अध्यक्षांनी भाजपाला प्रत्येक गट व गणात आघाडीवर ठेवण्याचा निर्धार करावा. आपल्या भागातील पक्षविस्ताराची जबाबदारी घेऊन दौरे करावेत. आपल्या कार्यकारिणीत समाजातील सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांचा समावेश करावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्षांना केले. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विविध योजना साकारल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीणसह विविध योजनांतून प्रत्येक घरात सरकारी योजनेचा लाभ पोचविला. आपल्या भागातील गरजू नागरिकांना लाभ देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.
