भिवंडी २०२० सालातील खुनाच्या गुन्ह्याच्या घटनेतील एका फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.साजन उर्फ बाबर मुमताज अहमद मन्सूरी (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सत्तार मन्सूरी यांची त्यांच्या उत्तर प्रदेश मधील जागेच्या वादातून साजन मन्सूरीसह अन्य तीन साथीदारांनी २० ऑगस्ट २०२० रोजी हत्येचा कट रचून गुलजार नगर येथील याकूब शेठच्या बिल्डिंग जवळ गोळ्या झाडून सत्तारची हत्या केली होती.याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ३०२, ३०७, १२० (ब) सह आर्म ऍक्ट ३, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती.मात्र त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी साजनला पोलिसांची कुणकुण लागताच तो पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.दरम्यान शांतीनगर पोलिस पथकाने उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने कौशल्यपुर्ण तपास करून साजनचा शोध घेवून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीस १० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..
