लेखन – निलेश किसन पवार
अनगाव , ता – भिवंडी , जि -ठाणे
🚩 जय शिवराय 🚩
आज १९ फेब्रुवारी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या
भगव्या हार्दिक शिवमय शुभेच्छा.
१९ फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाऊंच्या पोटी तेजप्रतापी शिवबांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले. अगदी बालवयातच माता जिजाऊंनी शिवबावर ऊत्तम संस्कार केले आणि त्यांना चांगल्या प्रकारे घडवले , मढवले. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान आणि आदर्श राजा होते. त्यांच्यामध्ये असंख्य चांगल्या गुणांचा समुच्चय होता. राजांचे व्यक्तिमत्व शौर्य , धैर्य , धाडस , पराक्रम , प्रबळ इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि रयतेवर जीवापाड प्रेम करणारा राजा अशा बहुविध गुणांनी परिपूर्ण होते. शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते. ते रयतेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत. राजांनी प्रजेवर कर लादून त्यांचे जीवन कष्टमय केले नाही. शिवाजी राजे शेतकऱ्यांचे कैवारी होते. महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की , शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि स्त्रीच्या पदराच्या काठाला अजिबात हात लावू नये. ‘ शेती पिकली तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राजा सुखी ‘ हे सूत्र महाराजांना समजले होते. छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी हित कायम जोपासले जायचे. म्हणून त्या काळात शेतकऱ्यांनी कधीही आत्महत्या केली नाही. स्वराज्यात प्रजा सुखी व समाधानी होती. त्यामुळेच सामान्य प्रजेला शिवाजी महाराज जणू दैवत वाटायचे.
शिवाजी महाराज हे अष्टपैलू , सर्वगुणसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न होते. ते एक थोर युगपुरुष होते तसेच
ते धर्मनिरपेक्ष राजे होते. महाराज धर्मनिष्ठ असले तरी ते धर्मवेडे नव्हते.
ते हिंदू राजे असूनही त्यांनी कधी मुसलमानांशी दूजाभाव केला नाही. उलट त्यांनी आपल्या नोकरीत मुसलमानांना जागा दिली. मुसलमानांना कायम औदार्याने वागवले. राजांनी सर्व जाती धर्मांचा आदर केला. म्हणून तर स्वराज्यात कधीही जाती धर्माच्या नावाने दंगल झाली नाही. स्वराज्यात हिंदूं प्रमाणेच मुसलमानही सुखा – समाधानाने राहत होते. कारण शिवरायांचा मंत्र सर्व कल्याणाचा होता. महाराजांनी
पर स्त्रीला कायम मातेसमान मानले. जर युद्धात शत्रूच्या स्त्रिया सापडल्या किंवा बंदी केल्या गेल्या तर त्यांना सन्मानपूर्वक परत पाठवावे अशी राजांची आज्ञा होती. कारण तो स्त्रियांना दरबारात नाचवणारा नाही तर स्त्रियांना वाचवणारा राजा होता.
शिवाजी महाराजांनी मनात आणले असते तर ते ऐशो आरामात जीवन जगू शकले असते. पण त्यांनी आपले अवघे आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले. छत्रपतींसोबत एकनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांची निष्ठा हिऱ्या माणक्यासारखी तेजःपुंज होती. महाराजांना तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे , मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते , मोरोपंत पिंगळे , प्रतापराव गुजर , नेताजी पालकर , कान्होजी जेधे , येसाजी कंक , जीवा महाला , शिवा काशिद अशा अनेक मावळ्यांनी मोलाची साथ दिली. खरं तर अशी निष्ठावान माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत . ती माणसं राजांनी कमावली. महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून रयतेचे लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. स्वतःच्या संसाराची होळी करून दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाची दिवाळी आणली.
शिवरायांचा इतिहास हा जसा ढाल तलवारींचा , लढाया आणि घनघोर संघर्षाचा आहे तसाच तो समतेचा , प्रागतिक विचारांचा , महिलांच्या सन्मानाचा आणि आदर्श शेतकरी धोरणाचासुद्धा आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ओजस्वी प्रतिभेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती केली आहे –
‘ यशवंत , कीर्तिवंत , सामर्थ्यवंत , वरदवंत , पुण्यवंत , नीतीवंत जाणता राजा ‘ यातील शब्द न शब्द महाराजांना लागू पडतो. राजांसारखी व्यक्ती ना कधी जन्माला आली, ना पुन्हा कधी जन्माला येईल. महाराजांचे धवल चरित्र आणि चारित्र्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
एक सामर्थ्यशाली योद्धा , आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष , युगप्रवर्तक जाणत्या राजाला जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज
की जय 🚩
