कल्याण, दि. २९ (प्रतिनिधी) : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कल्याण पश्चिम भागाचा नियोजनबद्ध विकास व प्रगतीसाठी भाजपाचे तरुण तडफदार माजी नगरसेवक वरुण पाटील यांच्यासारख्या नव्या विचारांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे शेकडो रहिवाशांनी भेट घेऊन सांगितले. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेत वरुण पाटील यांनी भाजपाचे आधारवाडी प्रभाग क्र. २० मधील नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य आणि भाजपाचे गटनेते म्हणूनही कार्य केले आहे. कल्याण शहरातील गणेशोत्सव ऐतिहासिक असून, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. नगरसेवकपदाच्या पहिल्या टर्मपासून ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, कॉंक्रिट रस्त्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. महिला सक्षमीकरणाबरोबर युवा वर्गाच्या प्रगतीसाठी ते सातत्याने विविध उपक्रम राबवित आहेत. कोरोना आपत्तीच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वरुण पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सदस्यपदी कार्य करतानाही वरुण पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर करताना शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यासमवेत भाजपाचे विभागीय सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, कोनगावच्या सरपंच श्रीमती रेखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजा सावंत, हेमंत परांजपे, सुधीर वायले आदी उपस्थित होते.
