लेखक – निलेश किसन पवार
अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे.
आज १५ ऑक्टोबर , वाचन प्रेरणा दिवस आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ
डॉ. ए.पी. जे . अब्दुल कलाम यांना पुस्तकांचे प्रचंड वेड होते. म्हणून त्यांच्या जयंती निमित्ताने वाचन दिंन
साजरा केला जातो. त्यामुळे वाचनाचे महत्व सांगणारा हा लेख.
‘ वाचाल तर वाचाल ‘ हा फक्त एक सुविचार नाही तर ते एक निर्विवाद सत्य आहे. जर तुम्ही पुसके वाचाल तर तुम्ही जीवनात वाचाल असा त्याचा अर्थ आहे. वाचन करणे ही खूप चांगली सवय आहे. वाचनाचे असंख्य फायदे आहेत. वाचनाने ज्ञान , चांगले विचार , आत्मविश्वास , प्रेरणा ह्या गोष्टी प्राप्त होतात. वाचन केल्याने संपूर्ण मेंदूचा व्यायाम होतो. त्यामुळे त्यामुळे मेंदू तल्लख , तरतरीत , आणि चपळ राहतो. वाचनाने स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते तसेच विचारांची पक्की बैठक तयार होते. वाचन करणारा माणूस चौफेर विचार करू शकतो.
वाचन करणारा माणूस टेन्शन पासून दूर व नेहमी सजग आणि सतर्क राहतो. वाचनामुळे विचारशक्ती , कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती या मानसिक शक्तींचा विकास होतो. वाचनातून माणूस वैचारिकरित्या संपन्न बनतो. एकूणच काय तर वाचनाच्या सवयीमुळे माणूस घडतो व मोठा होतो.
जीवनात पुस्तकांचे महत्व मोठे अगाध आहे.पुस्तके माणसाची मस्तके समृद्ध करतात. पुस्तके म्हणजे ज्ञानाचे भांडार . पुस्तकांमधून आपल्याला उच्च कोटीचे ज्ञान मिळते. भारतातील अनेक महान माणसे पुस्तकप्रेमी होती. स्वामी विवेकानंद , लोकमान्य टिळक ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, उत्तम कांबळे या सर्वांचे वाचन अफाट होते. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांनाच आपला गुरु मानायचे. ते तहान भूक विसरून वाचन करायचे. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सांगायचे , ‘ एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते.’
पुस्तके माणसाला ज्ञानसंपन्न व विचारसंपन्न बनवतात. पुस्तके बुद्धीला गंज लागू देत नाहीत. पुस्तके माणसाला आशावादी बनवतात. जो माणूस पुस्तकांच्या संगतीमध्ये राहतो तो कधीच वाया जात नाही. जर तुम्हाला जीवनात प्रगती करून मोठं आणि यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजेत.
