भिवंडी दि.१०/१०/२०२४ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत असताना महाराष्ट्र शासनाने आशा सेविका, मदतनीस यांना प्रती फॉर्म मागे ५० रुपये देण्याचे आश्वासित केले होते.परंतु लाडक्या बहिणींचा प्रती महिन्यांचा १५०० रुपयांचा हफ्ता देत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला मात्र लाडक्या बहिणींच्या ताईंचा विसर पडला की काय असेच काही राज्य भरातून दिसून येत आहे.त्यातच भिवंडी तालुक्यातील शहरी,ग्रामीण मधील तब्बल १०२७ ‘ताईं’ कडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.यामध्ये भिवंडी महापालिका अखत्यारीतील एकूण ३०४ आशा सेविकांचा समावेश आहे.तर भिवंडी ग्रामीणमधून प्रकल्प १ -२ अंतर्गत ३८७ आशा सेविका आणि ३३६ मदतनीस असा एकूण ७२३ चा आकडा आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आस धरून बसलेल्या ‘ ताई ‘ प्रती फॉर्म ५० रुपयांच्या प्रतीक्षेत वाट बघत आहेत.कारण ३ महिन्यांपासून बहिणींना मिळणारा १५०० रुपयांचा लाभ हा ‘ ताईं ‘ नी बहिणींकरिता केलेल्या पोर्टल,लिंक द्वारे मिळत असून या लाभाचे खरे श्रेय ‘ ताईं ‘ नाच असूनही त्या सर्व लाभापासून वंचित आहेत.त्यामुळे शिंदे सरकारने लाभार्थी बहिणीं प्रमाणे बहिणींच्या लाभार्थी ‘ ताईं ‘ ना लाभापासून वंचित न ठेवता प्रती फॉर्म ५० रुपये प्रमाणे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी आशा सेविका, मदतनीस यांच्याकडून जोर धरत आहे.
