भिवंडी: मानवाला जीवन जगण्यासाठी श्वास अत्यंत महत्त्वाचा आहे, जर श्वास नसेल तर माणूस जगूच शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षक या देशाचे श्वास आहेत,शिक्षकांमुळे देशाचे भविष्य घडत असते,शिक्षक नसतील तर काहीच नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.मंगळवारी भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अंजुर फाटा येथील ओसवाल शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सन्मान सोहळ्या प्रसंगी म्हात्रे बोलत होते. याप्रसंगी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे ,गटशिक्षण अधिकारी संजय असवले यांच्यासह तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरूंप्रती आपल्या मनात श्रद्धा आहे,शिक्षकांनी आम्हाला शिकविले नसते तर आज इथं पर्यंत पोहचलो नसतो.विद्यार्थी शिकून अधिकारी राजकारणी,वकील ,इंजिनियर होऊन मोठा माणूस झाला तर तो कायम कोणत्यान कोणत्या मार्गाने शकत असतो त्यामुळे तो नेहमीच विद्यार्थी असतो मात्र शिक्षक हे कायम शिक्षकच असतात.शिक्षक हे देशातील महत्वाचे घटक आहेत मात्र इतर देशात जी वागणूक शिक्षकांना मिळते ती वागणूक दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षकांना मिळत नसून त्यांचा पगार देखील तुटपुंजा असतो अशी खंत देखील म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना देखील सन्मानित करण्यात आले.कवाड जिप शाळेच्या शिक्षिका संध्या विनायक भालेराव,दाभाड शाळेचे रवींद्र बळीराम जाधव,करंजोटी शाळेचे सुरेश बळीराम जाधव,चोरांबे झिडके शाळेच्या मिनल महेश पाटील,वडूनवघर पेंढरीपाडा शाळेचे मेघनाथ मुरलीधर तरे,सरवली पाडा शाळेच्या सुजाता विनोद निंबाळकर,पिसे चिराड पाडा शाळेचे निवास रामराव वाघमारे,पालखणे शाळेच्या स्नेहा नरेंद्र पाटील या आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुतस्कराने खासदार बाळ्या मामा यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
