शहापूर : आषाढी कार्तिकी आणि पंढरपूरची वारी यांचे वेगळे असे नाते आहे . शेतीची कामातून थोडी उसंत काढून अनेक वारकरी हे आपल्या लाडक्या विठूरायचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढ महिला सुरु झाला की प्रत्येक वारकऱ्याला आपल्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात . वारक-यांच्या याच भक्तीभावाचा आणि श्रद्धेचा आदर राखत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने वारी जिजाऊची, विठुरायाच्या दर्शनाची या संकल्पनेखाली सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, वारकरी संप्रदायिक मंडळी यांच्यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आषाढी वारी साठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
भिवंडी, शहापूर , कल्याण, आसनगाव , टिटवाळा अश्या विविध भागांतून पंढरपूरसाठी जाणाऱ्या एकूण ३००० वारकऱ्यांच्या मोफत प्रवास ,राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केली आहे. शहापूर ते पंढरपूर दि. 16, 17 व 18 तारखेच नियोजन करण्यात आले आहे .शहापूर तालुक्यातील एक हजार वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर येथे दर्शनासाठी घेऊन जात असल्याचे शहापूर येथील जिजाऊ शाखेच्या वतीने सांगण्यात आले .
“ज्या प्रमाणे एखादे लहान मुल आपल्या आईच्या ओढीने आईकडे झेपावते त्याचप्रमाणे निरागस बालकाप्रमाणे असलेला वारकरी हा आपल्या विठुमाऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरच्या ओढीने वारी करतो. वारकरी आणि पांडुरंगाचे नाते हे माय लेकरासारखे आहे . म्हणूनच संत जनाबाईंनी विठू माझा लेकुरवाळा असे म्हटले आहे . तर वारकरी हे आपल्या विठ्ठलाला विठूमाऊली असे संबोधतात . पांडुरंग आणि वारकरी यांची ही भेट डोळ्यांचे पारणे फेडणारी असते . म्हणूनच या अनोख्या सोहळ्यात आपला काहीतरी हातभार लागावा या हेतूने वारकरी विठूभक्तांसाठी आपण मोफत बस , निवास आणि भोजनाची व्यवस्था केली असल्याचे सांबरे यांनी सांगितले तर यावेळी आपण हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे देखील सांबरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले .
