भिवंडीत बाहेरील जड अवजड वाहनांना २४ तास बंदी
गुडीपाडव्यापासून अधिसूचना लागू

भिवंडी

भिवंडी शहरातुन वाडा, नाशिक,मुंबई,अंजूरफाटा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास २४ तास बंदी करण्यात आली असून गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांनी वाडा मार्गे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका उड्‌डाणपूलावरून जाण्यासाठी अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे शहराबाहेरील जडवाहनांमुळे शहरात  होणारे अपघात नियंत्रित होणार आहेत. काल गुढीपाडव्यापासून हि अधिसूचना लागू केली आहे. 
                भिवंडी शहर हे मुंबई महानगर प्रदेशाचे प्रवेशद्वार असल्याने गुजरात कडून मुंबईकडे व मुंबईकडून परत गुजरातकडे त्याचप्रमाणे गुजरातकडून नाशिककडे व नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या जाड अवजड वाहनांची भिवंडी शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. सदर वाहतूक संक्रमण प्रकारची आहे.भिवंडी शहरामध्ये मोठा वस्त्रोदयोग असल्याने त्याच्याशी पुरक यंत्रमाग, डाईंग, सायझींग असे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच शहरामध्ये प्लास्टिक मोती बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भिवंडी हे लॉजिस्टीक पार्कने हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहरातुन मोठ्या प्रमाणात जड अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू असते. सदर वाहतूक भिवंडी शहरातून सुरू होणारी व संपणारी या प्रकारची असते.
                     शहरातील माल वाहतुकीच्या वाहनांच्या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय,उप-जिल्हा रुग्णालय,बाजारपेठा, बँका, दवाखाने, शाळा, महाविद्यालय असून शासकीय कर्मचारी, दैनदिन व्यवहाराकरीता येणारे जाणारे नागरिक, दवाखान्यात दवाउपचाराकरीता येणारे रूग्ण, तसेच महाविदयालयात येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूक कोंडी होवून सामान्य नागरिकांना मनस्ताप व असुविधा होते. तसेच या व्यवसायिक वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात, प्राणांतिक अपघात तसेच प्राणहानी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे भिवंडी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जनतेच्या सोईसाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी अधिसूचना जारी केली आहे.

भिवंडी महानगराची लोकसंख्या सुमारे १० लाखापर्यंत पोहोचलेली असून ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अभिलेखानुसार २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भिवंडी शहरात सर्व प्रकारची वाहने मिळून ३,९९,६८३ वाहनांची नोंद करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त भिवंडी शहर  औदयोगिक शहर असल्याने येथे बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे शहरातुन होणारी जड अवजड वाहनांना शहरातून वाहतूक करण्यास बंदी करावी यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी सरकारकडे मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *