महाराष्ट्राचे आराध्य दैवत
     छत्रपती शिवाजी महाराज

लेख

🚩

  लेखक – निलेश किसन पवार
अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे.
  
       आज १९ फेब्रुवारी , शिवजयंती आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना
शिवजन्मोत्सवाच्या  भगव्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस . शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो.
       शिवबांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी झाला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंकडून चांगले संस्कार आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला.


         छत्रपती शिवाजी महाराज हे एक कर्तृत्ववान युगपुरुष होते. ते आपल्या सर्वांचे दैवत आहेत. मराठी माती आणि मातृभूमीचा ते अभिमान आहेत. इतिहासात राजे तर अनेक होऊन गेले ; परंतु शिवाजी महाराज हे एकमेव , अद्वितीय आणि
पृथ्वीतलावरील सर्वोत्तम राजे होते. शिवाजी राजांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टी , असीम धैर्य , शौर्य , पराक्रम,  धाडस
प्रबळ इच्छाशक्ती, मुत्सद्दीपणा , रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा अशा बहुविध गुणांनी परिपूर्ण होते.
        शिवाजी महाराजांनी रयतेचे लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य उभे करण्यासाठी त्यांनी  आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्रसंगी जीवघेणा संघर्ष केला. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी , समस्या , संकटे आली परंतु त्यामुळे राजे घाबरले नाहीत, निराश व हतबल झाले नाहीत की हातपाय गाळून बसून राहिले नाहीत. तर त्या प्रसंगांना आपल्या हिमतीने , युक्तीने आणि नियोजनाने त्यांनी उत्तर दिले. संकटांच्या डोंगरातून राजांनी रस्ता खोदला . कारण राजे संकटसमयी लढणारे होते , रडणारे नव्हते. आपल्याला सुद्धा महाराजांपासून समोर आलेल्या अडचणींना , संकटांना घाबरून न जाता लढायचे , भिडायचे बळ मिळते.
         राजांचे विचार आणि कार्य सकल मानव जातीच्या कल्याणाचे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला तरी कळवळणारा तो राजा होता. म्हणजेच जनतेच्या एका पैशाचेही नुकसान होऊ नये याकरता राजे सतत दक्ष असायचे.
शिवकाळात देखील दुष्काळ होता , गरिबी होती . म्हणून महाराजांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी – बियाणे  नांगर , बैल उपलब्ध करून दिले. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली. त्यामुळे उत्पादन अनेक पटींनी वाढले. शेतातील धान्य विकण्यासाठी बाजारपेठांची सोय करून दिली. शिवरायांचे हे शेतकरी धोरण शेतकरीप्रधान होते. म्हणूनच शिवकाळात शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केल्या नाहीत. स्वराज्यात प्रजा सुखी , समाधानी व समृद्ध होती.
            शिवाजी महाराज हे कुठल्याही जाती – धर्माविरूद्ध नव्हते , तर ते अन्यायाविरुद्ध होते. त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती. ते धर्म व जाती भेद मानत नसत. कारण शिवराय सर्वांचे होते. राजांनी जाती – पातीच्या पलीकडे जाऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यांनी आपल्या राज्यातील मुसलमानांना औदार्याने वागवले. स्वराज्यात हिंदुंप्रमाणेच मुसलमानही सुखा – समाधानाने राहत होते. म्हणून तर स्वराज्यात कधीही जाती – धर्माच्या नावाने वाद तंटे किंवा दंगली झाल्याचे दिसून येत नाही. कारण शिवरायांचा मंत्र सर्व कल्याणाचा होता. महाराजांनी लढाईच्या वेळी कधीही मशिदी , दर्गे नष्ट केले नाहीत. कधीही कुठेही एकही कुराण जाळले नाही आणि कुणालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले नाही.
      शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आणि चारित्र्य अद्भुत आहे. राजांच्या ठायी असंख्य चांगल्या गुणांचा समुच्चय होता. राजांना साधू संतांविषयी अतिशय आदर व आत्मीयता होती. महाराज स्त्रियांच्या अब्रूबाबत फार दक्ष असायचे. सर्वांनी स्त्रियांचा आदर सन्मान केलाच पाहिजे. स्त्री ही शत्रुची असली तरी तिचा आदर करावा ही शिवाजी राजांची नीती होती. त्यांनी शत्रूच्या स्त्रियांनासुद्धा सन्मानपूर्वक वागवले. म्हणूनच त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा यथोचित सन्मान करून तिला तिच्या घरी सुखरूप परत पाठवले.
       शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे ५० वर्षांची तेजस्वी कारकीर्द होती. राजे स्व कर्तृत्वावर घडले. त्यांनी आपले अवघे आयुष्य फक्त प्रजेच्या कल्याणासाठीच खर्च केले. आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण प्रजेसाठीच झिजवला. राजांनी  मावळ्यांसोबत स्वतःच्या संसाराची होळी करून दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाची दिवाळी आणली. महाराजांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी व जगासाठी आदर्श आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. आज ३५० वर्ष होत आली तरी त्यांच्याविषयी अपार प्रेम आणि आदर सर्व सामान्य जनतेच्या मना मनात भरून आहे.
        एक सामर्थ्यशाली योद्धा , आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष आणि युगप्रवर्तक जाणता राजा ज्याने शून्यातून स्वराज्य आणि स्वराज्यातून सुराज्य घडवले अशा छ्त्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
     🚩 जय शिवराय 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *