————————————-
*डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक*
*कथा*
*कोणाला मदत करताना आपला हेतू काय असतो, ती मदत आपण करतो, का आपल्या द्वारे ती करवून घेतली जाते ?*
*ईश्वर देतो !*
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आंध्र प्रदेशाच्या भूमीवर,एक उदार राजा राज्य करत होता.
रोज दोन भिकारी त्याच्या दरबारात भिक्षेसाठी येत असत, आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण आणि धन देत असे.
भिक्षा घेतल्यानंतर त्या दोघा भिकाऱ्यातील एक वृद्ध भिकारी कायम ईश्वराला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे, “भिक्षेत जे काही मिळते, ते ईश्वर देतो.”
दुसरा भिकारी जो त्या वृद्धांपेक्षा कमी वयाचा होता, भिक्षा मिळाल्यावर कायम राजाला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे, “भिक्षेत जे काही मिळते, ते सर्व राजा देतो.”
राजाला त्या वृद्ध भिकाऱ्याचे बोलणे अजिबात आवडत नसे. परंतु तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे.
एके दिवशी राजाने त्या भिकाऱ्यांना नेहमीपेक्षा अधिक धन दिले. हे बघून तो वृद्ध भिकारी आनंदाने आणि उत्साहाने ईश्वराला धन्यवाद देऊ लागला. आणि म्हणाला, “आम्हाला जे काही मिळते, ते ईश्वर देतो.”
यावेळी राजा त्या भिकाऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही, आणि मनातल्या मनात विचार करू लागला, “मी या भिकाऱ्याला कितीही धन दिले, तरीसुद्धा हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतो आणि सांगत असतो की ईश्वर देतो, ईश्वर देतो.”
राजाने मनातल्या मनात निश्चय केला, की आता वेळ आली आहे त्या वृद्ध भिकाऱ्याला समजावण्याची की त्याचा खरा हितचिंतक कोण आहे ते.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा ते दोन्ही भिकारी दरबारात भिक्षा घेण्यासाठी आले, तेंव्हा राजाने भिक्षा दिल्यानंतर दोन्ही भिकाऱ्यांना आदेश दिला, की ते रोज ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने न जाता, एक छोटा रस्ता आहे, ज्याच्यावर वर्दळ कमी असते तिथून जावे.
राजाने सांगितले की, “आज दोघे बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी जा.”
राजाच्या आदेशानुसार आधी तरूण भिकारी त्या रस्त्याने जाईल आणि त्यानंतर वृद्ध भिकारी जाईल.
राजाने, आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचे आदेश दिले होते, जेणेकरून जेंव्हा तो तरूण भिकारी त्या रस्त्याने जाईल त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल.
जेंव्हा तो तरूण भिकारी त्या रस्त्यावरून जात होता, तेंव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला, “राजाने त्याला या रस्त्यावरून का पाठवले असावे ? येथे तर किती शांतता आहे. वृक्षांनी वेढलेला हा रस्ता किती सुंदर दिसतो आहे. कदाचित राजाला वाटत असेल, की मी या सभोवतालच्या दृष्याचा आनंद घ्यावा! मी तर या रस्त्यावरून डोळे बंद करून पण चालू शकतो.” असा विचार करत तो तरूण भिकारी आपले डोळे बंद करून चालू लागला.
यामुळे तेथे सोन्याने भरलेली पिशवी न बघताच तो पुढे निघून गेला. जेंव्हा तो वृद्ध भिकारी त्या रस्त्याने जाऊ लागला, त्याने ती सोन्याने भरलेली पिशवी बघितली आणि त्याने ती उचलून घेतली.
दुसऱ्या दिवशी राजाने त्या दोघांना विचारले की, “काल त्या रस्त्यावर काही पडलेले तुम्हांला सापडले का?”
त्या तरूण भिकाऱ्याने नाही म्हणून मान हलवली आणि सांगितले, “तो रस्ता तर खूप स्वच्छ आणि शांत होता. छान थंड हवा वाहत होती. मी डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेत त्या रस्त्यावरून चालत होतो, यामुळे मी तेथे काहीही बघितले नाही.”
तेंव्हा त्या वृद्ध भिकाऱ्याने सांगितले, “मला तेथे सोन्याने भरलेली पिशवी सापडली. आयुष्यात जे काही मिळते, ते सर्व ईश्वरच देतो.”
भिकाऱ्याचे बोलणे ऐकून आता राजाने मनातल्या मनात दृढनिश्चय केला, की जोपर्यंत त्या वृद्ध भिकाऱ्यासमोर मी हे सिद्ध करत नाही, की देणारा ईश्वर नसून, राजा आहे आणि मीच त्याचा खरा हितचिंतक आहे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
म्हणून जेंव्हा ते दोन्ही भिकारी भिक्षा घेऊन परत जात होते, तेंव्हा राजाने त्या तरूण भिकाऱ्याला परत बोलवले आणि त्याला एक भोपळा दिला.
राजाच्या आदेशानुसार, तो भोपळा आधीच आतून पोखरून त्यात चांदीची नाणी भरण्यात आली होती.
परंतु त्या तरूण भिकाऱ्याला हे माहीत नव्हते आणि त्याने विचार केला की ह्या भोपळ्याचे तो काय करणार. याच्यापेक्षा चांगले की मी याला विकून टाकतो. रस्त्यातच,तो भोपळा त्याने एका व्यापाऱ्याला विकून टाकला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा दोन्ही भिकारी राज दरबारात पोहोचले, तेंव्हा राजाने भिकाऱ्यांना विचारले की, “काल तुमच्याबरोबर कुठली घटना घडली का?”
तरूण भिकाऱ्याने सांगितले, “काहीच विशेष झाले नाही, शिवाय हे, की तुम्ही मला इतक्या उदारतेने जो भोपळा दिला होतात, त्याला विकून मी रोजच्यापेक्षा काही अधिक पैसे कमावले.”
हे ऐकून राजा खूपच निराश झाला आणि अगदी उदास मनाने त्याने तोच प्रश्न वृद्ध भिकाऱ्याला विचारला.
वृद्ध भिकाऱ्याने उत्तर दिले, “काल माझ्याबरोबर तर एक खूपच असामान्य घटना घडली. जेंव्हा मी भीक मागून घरी परतत होतो, तेंव्हा एका व्यापाऱ्याने मला बोलावले आणि मला एक भोपळा दिला. जेंव्हा मी घरी जाऊन त्याला कापले, तेंव्हा मला तो चांदीच्या नाण्यांनी भरलेला आढळला. जसं की मी नेहमीच सांगत असतो, की आयुष्यात आपल्याला जे काही मिळते, ते ईश्वर देतो.”
हे ऐकल्यावर राजा एकदम सुन्न झाला!
*बोध*
*”आपण ईश्वराबद्दल काय सांगू शकतो? तो अनंत आहे. सीमित विषयावर आपण पोथ्या लिहू शकतो. परंतु ‘ अनंताच्या ‘बाबतीत आपण एकही शब्द सांगू शकत नाही.”*
************************
*डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक*
