Success Story Of Mumbai Lady Singham Ips Officer N Ambika
कुठल्याही संकाटापुढे मान न झुकवता धैर्य आणि चिकाटीने त्यावर मात करत आपण आपले ध्येय गाठले पाहिजे, या उक्तीचे जिवंत उदाहरण असणाऱ्या एन. अंबिका यांना आता मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते.
Inspiration | 14व्या वर्षी लग्न तर, 18व्या वर्षी मातृत्व, तरीही जिद्दीने पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न!
आयपीएस अधिकारी एन. अंबिका ..
काही लोक प्रेरणा बनून इतरांचे आयुष्य प्रकाशित करतात. आयपीएस अधिकारी एन. अंबिका याही अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा जीवन प्रवास केवळ तरुण पिढीसाठी प्रेरणाच नाही तर, आयुष्यातील संघर्षावर मात करत कसे पुढे जावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. कुठल्याही संकाटापुढे मान न झुकवता धैर्य आणि चिकाटीने त्यावर मात करत आपण आपले ध्येय गाठले पाहिजे, या उक्तीचे जिवंत उदाहरण असणाऱ्या एन. अंबिका यांना आता मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जाते. मात्र, 2008 पूर्वी त्यांची ओळख काहीतरी वेगळीच होती. त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय अवघड होत्या (Success story of Mumbai lady Singham IPS Officer N Ambika).
IPS बनण्याचे स्वप्न
वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी अंबिका यांचा विवाह पार पडला. इतकेच नाही तर, 18व्या वर्षी त्यांच्या पदरात 2 मुले देखील होती. अंबिका याचे पती पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते. त्यांच्यासोबतच अंबिका स्वातंत्र्य दिनी होणारी परेड पाहायला जायच्या. *यावेळी त्यांनी आपल्या पतीला एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ‘सॅल्यूट’ करताना पहिले. ते कोण होते? आणि आपल्या पतीने त्यांना अभिवादन का केले?, असा प्रश्न अंबिका यांना पडला.* यावर त्यांच्या पतीने त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी होण्यासाठी सिव्हील सर्विसेसची परीक्षा द्यावी लागते, हे देखील त्यांनी सांगितले. याचवेळी आपण ही अशी परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचं, असा निश्चय अंबिका यांनी केला.
जेव्हा पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली…
अंबिका यांची शाळा केव्हाच सुटली होती. आता त्या संसारात रमल्या होत्या. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ही कठीण परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होण्याचा ठाम निश्चय केला होता. यासाठी त्यांनी एका खाजगी कोचिंग क्लासमधून 10वीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर डिस्टंस लर्निंगच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे सगळं सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला आयपीएस अधिकारी बनण्याची तयारी देखील सुरु होती (Success story of Mumbai lady Singham IPS Officer N Ambika).
*पतीने दिली साथ* –
अंबिका आपल्या कुटुंबांसमवेत डिंडीगुल येथे राहत होत्या. त्या ठिकाणी कुठलेही कोचिंग सेंटर नव्हते. अशावेळी अंबिका यांनी चेन्नईमध्ये राहून सिव्हील सर्विसेसच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयात पतीने खंबीर साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईमध्ये राहत होत्या, तेव्हा त्यांचे पती पोलीस खात्याची निकारी सांभाळून, दोन्ही मुलांचे पालनपोषण देखील करत होते. मात्र, अंबिका यांच्यासाठी देखील ही स्थिती काही सामान्य नव्हती.
तीन वेळा पदरी आले अपयश…
अंबिका एक नव्हे तब्बल तीन वेळा या परीक्षेत अपयशी ठरल्या. मात्र, यानंतरही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. सलग तीनवेळा नापास झाल्यावर त्यांनी पुन्हा घरी यावे, अशी इच्छा त्यांच्या पतीने व्यक्त केली होती. परंतु, त्यांनी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या शेवटच्या प्रयत्नाला मात्र घवघवीत यश मिळाले. 2008मध्ये अंबिका परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘आयपीएस अधिकारी’ बनल्या. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर अंबिका यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. सध्याच्या घडीला अंबिका मुंबईतील झोन-4च्या ‘डीसीपी’ आहेत. याचबरोबर त्या मुंबईच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून देखील ओळखल्या जातात.
