मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महागाईच्या भडक्याने ग्रामीणच्या दिवाळीतील ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अस्तंगतेच्या दिशेने ;शेतीप्रधान देशाला वाचवण्यासाठी वृद्धांची शासनाला आर्तहाक

भिवंडी



भिवंडी दि.14 ( गांवकरी TODAY NEWS ) दीपोत्सवातील बलिप्रतिपदेच्या दिवशी ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अशा आवाजाने ‘बळी राजाला’ झोपेतून जागे करून बैलांची पूजा करीत गावभर फिरून दवंडी पिटणारा कोतवाल वाढत्या महागाईच्या भडक्याने अस्तंगतेची शेवटची औट घटिका मोजत असल्याचे भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या ठाणे – पालघर जिल्ह्यातील ग्रामीणमधून पहावयास मिळत आहे.तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला शेतीप्रधान देश म्हणून जगभर विकासाची गाथा सांगून प्रगत देशाचे स्वप्न पाहत असताना महागाईने गळा आवळला जात असल्याने ग्रामीण भागात शेतीचा टक्का वजा होऊन ‘बळी’ चा राज्य येणार कसा ? असा सवालही या बलिप्रतिपदेच्या प्रथेच्या नामशेषाने उपस्थित होत आहे.अंधकाराच्या काळ्या गर्तेतून लख्खमय प्रकाशाच्या उजेडातून प्रगल्भतेच्या दिशेने घेऊन जाणारा व मिठाईच्या गोड आस्वादाने लहानांपासून वृद्धांना तृप्त करणारा सण म्हणून दिवाळी सणाची ओळख आहे.फटाक्यांची आतषबाजी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या स्पर्धा,सांस्कृतिक – पारंपरिक कार्यक्रमांचा भरणा असलेला हा तेजोमय सण आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा अशा ४ दिवस उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या दिवाळी सणाच्या कालावधीत बलिप्रतिपदेच्या दिवशी गेल्या अनेक पर्वापासून ठाणे – पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावी एक कोतवाल ठरवून प्रथेनुसार तो दवंडी पिटून ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अशी ओरड करीत मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या वेळेपर्यंत गावभर फिरून मोठ्या स्टीलच्या परातीत बैलांची जोडी असलेली मूर्ती ठेवून पूजेच्या सामानासह ग्रामीण भागातील घरोघरी जाऊन नागरिकांच्या कानात तेल टाकून नागरिकांसह बळीराजाचा मित्र बैल राजाला शेतीकामात बळ प्राप्त होण्यासाठी बैलांची गोठ्यात जाऊन पूजा करत आहे.परंतु सद्यस्थितीतील कामगारांची वाढती मजुरी,अवकाळी पाऊसासह महागाईचा भडका अशा विविध कारणांनी बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिकरित्या शेतीकडे पाठ फिरवल्याचे सर्वत्रच दिसून येत आहे.परिणामी ग्रामीणमध्ये शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात अवकळा लागल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईमुळे बळीराजाला बैलांच्या पालन पोषणाचा खर्च परवडत नसल्याने दिवाळी काळातील बलिप्रतिपदेच्या दिवशी तो कानात घुमणारा ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ चा आवाज काही वर्षात पूर्णपणे बंद होऊन ही प्रथा लुप्त होण्याची शक्यता ग्रामीणमधील आबाल वृद्धांनी व्यक्त केली असून शेती व्यवसाय वाचवण्याकरिता शासनाने उच्च स्तरावर कठोर पाऊले उचलून विशेष उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढत शेतीप्रधान देशाला चालना द्यावी,अशी प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.दरम्यान एकीकडे आर्थिक मंदीमुळे भिवंडीतील यंत्रमागाची धगधग याअगोदरच अडचणीत सापडली आहे.तर दुसरीकडे महागाईच्या उद्रेकाने शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र दिवाळी सणातून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *