भिवंडी दि.7( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या पत्रकार कक्षाला जनसंपर्क विभागाने सोमवारी अचानक टाळे लावल्याने महापालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा शहरातील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध केला.मनपा प्रशासनाच्या या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करण्यासाठी भिवंडीतील पत्रकारांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून मनपा आयुक्त अजय वैद्य व जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.त्या संदर्भातील लेखी निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.भिवंडी महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षाला अचानक टाळे मारल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटल्या नंतर पत्रकार कक्षास भाजपचे आमदार महेश चौघुले व शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध करत तत्काळ पत्रकार कक्ष खुले करण्यास सांगितले असता अवघ्या काही वेळातच जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांनी पत्रकार कक्ष खुले केले.यासंदर्भात मनपा आयुक्त अजय वैद्य यांचे मौखिक आदेश असल्याने पत्रकार कक्षास टाळे मारले असल्याची कबुली जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांनी
दिली आहे. जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर शहरातील सर्वच पत्रकारांनी मनपा आयुक्त अजय वैद्य यांचा जाहीर निषेध केला आहे.मनपा प्रशासनाचा मनमानी व बेकायदेशीर कारभार भिवंडीतील पत्रकार पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असल्याच्या रागाने मनपा प्रशासनाने पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष बंद करून शहरातील पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा घाट घातला असल्याचे आजच्या पत्रकार कक्ष टाळेबंद कृतीवरून स्पष्ट झाले असून मनपा प्रशासनाच्या या बेकायदेशीर कृतीचा शहरातील सर्व पत्रकार जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया शहरातील पत्रकारांनी दिली आहे.
