भिवंडी दि.4 ( गांवकरी TODAY NEWS ) खोटे टॅक्स इन्व्हाईस बनवून त्यावर कपड्याचे माल पाठवत असल्याचे भासवून दोन कापड कंपनीच्या मालकांनी प्रतिबंधित गुटख्याचा माल महाराष्ट्रात विक्री करण्याच्या हेतूने भिवंडीतील कंपनीत पाठवून कंपनीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी दोन कंपनीच्या मालकांवर नारपोली पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात आला आहे.स्टाईल इंडिया टेक्सटाईल्स प्रा.लि कंपनीचे मालक आणि आशा फेब्रिक्सचे मालक (दोन्ही रा.सुरत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर रोजीच्या दरम्यान आरोपी दोन्ही कंपनीच्या मालकांनी आपसात संगनमत करून ९ लाख ९६ हजार ५७० रुपयांच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा भिवंडीतील दिवे येथील इंडियन कंपाउंड येथील डिलीव्हरी लिमिटेडच्या वेगवेगळ्या वेअरहाऊसमध्ये खोटे टॅक्स इन्व्हाईस बनवून त्यावर कपड्याच्या मालाच्या नावाच्या नोंदी करून महाराष्ट्रातील विविध भागात विक्रीच्या उद्देशाने पाठवून डिलीव्हरी कंपनीची फसवणूक केली आहे.दरम्यान याची खबर नारपोली पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सदर प्रतिबंधित गुटख्याचा माल जप्त करून २ नोव्हेंबर रोजी पोह सुनिल वसंत जाधव यांच्या फिर्यादीवरून दोन मालकांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिसांची कुणकुण लागताच दोघेही आरोपी मालक फरार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.पुढील तपास सपोनि एस.टी. कर्णवर पाटील करीत आहेत.
