भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) खारबाव गावचे माजी सरपंचांसह पाये गावच्या उपसरपंचांनी एका साथीदाराच्या मदतीने कायदा हातात घेत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण करीत बुधवारी मालोडी टोलनाक्याची तोडफोड केली होती.त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याने गुरुवारी तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेंद्र द्वारकानाथ पाटील,प्रशांत गोकुळदास म्हात्रे व व्हिडीओ चित्रीकरण करणारा त्यांचा अन्य एक साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी १ ऑक्टोबर रोजी खारबावचे माजी सरपंच महेंद्र पाटील आणि पाये गावचे उपसरपंच प्रशांत म्हात्रे यांच्यासह त्यांचा अन्य एक साथीदाराने अंजूर – फाटा चिंचोटी रस्त्याची दयनीय दुरावस्था झाल्याचे सांगून गेल्या दहा वर्षांपासून अनेक मोर्चे,उपोषणे,आंदोलने करून रस्त्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदार सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि संबंधित प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करून कायदा हातात घेत असल्याची प्रतिक्रिया देत टोलनाक्याची तोडफोड करीत व्हिडीओ चित्रीकरण करून व्हायरल केला होता.या टोलनाका तोडफोडीने सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे कायद्याची पायमल्ली केल्याने गुरुवारी मालोडी सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे टोलप्लाझा मॅनेजर दिनेश जाधव यांच्या फिर्यादीवरून व्हिडीओ चित्रीकरणाच्या फुटेजवरून तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३३६,४२७,३४ सह म.पो.कायद्यान्वये तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान तोडफोडीच्या घटनेनंतर तिघेही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पुढील तपास सपोनि किरण मातकर करीत आहेत.