भिवंडी दि.01 ( गांवकरी TODAY NEWS ) पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याच्या रागातून दोन गटात तुफान राडा होऊन तीन जन गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडीतील न्यु टावरे कंपाउंड मधील देवनगरमधून समोर आली आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सद्दाम अन्सारी (२५),असलम अन्सारी(३६),नसीम उर्फ चांदबाबू सिद्दीकी (३०),आकाश पवार उर्फ चिकू (२५) अशी परस्पर विरोधात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तर प्रताप झिनकु यादव,नसीम कमालुद्दीन सिद्दीकी व त्याचा मित्र अब्युलेस जहीर अन्सारी अशी तुफान धुमश्चक्रीत गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रताप झिनकु यांचा जावई आकाशने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याचा जाब विचारत नसीमसह त्याचा मित्र अब्युलेस या दोघांना २९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून १० मिनिटांनी शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी तुडवून लोखंडी पाईपची उपट मारून जखमी केले होते.त्यानंतर या मारहाणीचा राग मनात धरून नसीमने त्याचे साथीदार सद्दाम व असलम याच्यासोबत १० वाजून ३० मिनिटांनी प्रतापच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत त्याचा जावई आकाशची विचारणा केली,त्यावेळी प्रतापने त्यांना शिवीगाळ करू नका असे सांगितल्याने या गोष्टीचा राग येवून तिघांनीही आपसात संगनमत करून प्रतापला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे.याप्रकरणी परस्परविरोधी ४ जणांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि समाधान मागाडे करीत आहेत.
