भिवंडी दि.२० ( गांवकरी TODAY NEWS ) घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर जागरणाकरिता बसलेल्या मंडळातील मित्राला दारूडया मित्रासह त्याच्या मोठ्या मुलाने शिवीगाळ करीत लाकडी दांडक्यासह बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या मारहाणीचा दारूडया मित्रासह लेकाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तंबी संमुग्गम केव्वडर व त्याचा मोठा मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बापलेकाची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दुर्गादेवीनिमित्ताने शांतीनगर हद्दीतील सहयोगनगर येथील यश हॉटेलच्या बाजूला १८ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास फिर्यादी निरज उमेशचंद्र रॉय हा सदस्यांसह दिलीप गुळवी यांच्या मंडळात बसला होता.दरम्यान त्याचा मित्र तंबी हा त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आला असता,त्याने क्षुल्लक कारणावरून मंडळातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यावेळी निरजने त्यास शिवीगाळ करू नको असे सांगितल्याच्या रागातून प्रथम तंबीने निरजला शिवीगाळ करीत हाताच्या चापटीने मारहाण केली.त्यानंतर तंबीच्या मोठ्या मुलाने लाकडी दांडक्याने निरजच्या डोक्यात उप्पट मारुन त्यास जखमी केले आहे.या मारहाण प्रकरणी बापलेकाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह बांबळे करीत आहेत.
