मनुष्य गौरव दिन,स्वाध्यायकार पांडुरंग शास्त्री आठवले – एक निष्काम कर्मयोगी

लेख



लेखक – निलेश किसन पवार
अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे

आज 19 ऑक्टोबर , स्वाध्याय परिवाराचे प्रणेते , संस्थापक , प्रवर्तक आणि गीता तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादा यांच्या जन्म दिवसानिमित्त 19 ऑक्टोबर हा दिवस ‘ मनुष्य गौरव दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मनुष्य गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधून देखील सापडणार नाही. वैश्विक स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादा हे या भारत भूमीतील एक कृतिशील , प्रयोगवीर तत्वचिंतक होते. आजच्या या आधुनिक काळात हाताशी भगवदगीता आणि भक्तीचा विचार घेऊन त्यांनी या आधुनिक भारताला व जगाला अध्यात्माचे विचार दिले. दादा नेहमी म्हणायचे की , ‘ भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे , तर मी त्या भगवंतपासून विभक्त नाही. ही पक्की समजूत म्हणजे भक्ती .’ दादांनी अध्यात्म हा विषय सोपा करून समाजातल्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवला.
त्यांनी गीताज्ञान अगदी साध्या , सोप्या सरळ भाषेत जनसामान्यांना समजावून सांगितले. गीतेबद्दल ते म्हणायचे , ‘ गीता हा केवळ धर्मग्रंथ नाही , तर तो जीवनग्रंथ आहे.
दादांनी स्थापन केलेल्या स्वाध्याय परिवाराचे लाखो अनुयायी आहेत. स्वाध्याय म्हणजे ‘ स्व ‘ चा अभ्यास (स्वतःचा अभ्यास ). आपण स्वतःचा ‘ स्व ‘ ओळखणे आणि दुसऱ्याच्या ‘ स्व ‘ बद्दल आदर बाळगणे म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे समजूतदारपणा , स्वाध्याय म्हणजे कर्तव्य परायणता , स्वाध्याय म्हणजे आदरनिष्ठा , स्वाध्याय म्हणजे जीवननिष्ठा. स्वाध्याय परिवारामध्ये ना जात आहे , ना पात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे. इथे सर्वात जास्त महत्व आहे ते माणसाच्या माणुसकीला. स्वाध्याय परिवार अशी शिकवण देतो की , माणसाचे डोके उडवून क्रांती होत नाही , तर माणसाचे डोके आणि विचार बदलून क्रांती करता येते. स्वाध्याय परिवाराचा कुठलाही कार्यक्रम पूर्व नियोजनाने , विलक्षण शिस्तीने आणि अतिशय भाव भक्तीने व प्रेमाने पार पडतो. कुठेही गडबड गोंधळ नाही की , कार्यक्रमानंतर कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.
स्वाध्याय परिवाराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे हजारो गावांमधून व्यसने व गुन्हेगारी हद्दपार झाली , भांडण तंटे मिटले. लोकांमध्ये अमुलाग्र परिवर्तन झाले. दादांच्या अध्यात्मिक शिकवणुकीमूळे तसेच त्यांच्या अमृतमय विचारांच्या प्रभावामुळे अनेक माणसे सुसंगतीच्या सन्मार्गावर आली. लोकांमध्ये एकता निर्माण झाली. दादांनी भावभक्तीला कृतीभक्तीची जोड दिली. त्यांनी या भोगवादी समाजात भाववादी विचार उभा केला. दादाजींचे हे कार्य खरंच ऋषितुल्य कार्य आहे . दादा म्हणजे एक साधं, शालीन आणि सोज्वळ व्यक्तिमत्व . त्यांना मोठेपणाचा आणि प्रसिद्धीचा हव्यास नव्हता. त्यांनी स्वतःला कधीही गुरू म्हणवून घेतले नाही. ते त्यांच्या अनुयायांमध्ये ‘ दादा ‘ म्हणूनच ओळखले जायचे. समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. भारताच्या स्वातंत्र्या नंतरच्या काळातील धर्म , संस्कृती , अध्यात्मातील महत्वपूर्ण आणि सर्वात अभिनव समाजसुधारक या नात्याने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांचे नाव घ्यावेच लागेल. खरंच , दादांसारखी माणसे क्वचित जन्माला येतात आणि आपल्या कामाने अजरामर होऊन जातात. आज स्वार्थ आणि मतलाबने बरबटलेल्या या जगामध्ये दादांचे हे स्नेहभावाने फुललेले कार्य प्रकर्षाने उठून दिसते.
आजच्या या पवित्र मनुष्य गौरव दिनी ज्या महापुरुषाने लाखो लोकांच्या जीवनात आमूलाग्र आणि सकारात्मक परिवर्तन घडवून लोकांचे आयुष्य प्रकाशमान केले त्या परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) या कृतिशील तत्वचिंतकाला त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.
🙏🏻🙏🏻 जय योगेश्वर 🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *