भिवंडी दि.१६ ( गांवकरी TODAY NEWS ) भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने प.रा. विद्यालयात वाचन मंदिर वार्षिक सभासदत्व वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,या निमित्ताने १६० विद्यार्थ्यांचे बाल सभासदत्व म्हणून नोंद करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देखील हिरहिरीने सहभाग घेतला.भिवंडीतील वाचन मंदिर संस्थेच्या १६० व्या वर्षात संस्थेचे सभासद वाढविणे, विशेष करून विद्यार्थ्यांच्या वाचनाकडे विशेष लक्ष देणे, त्यांना वाचनालयात आणणे अपेक्षित आहे, याकामी संस्था वेगवेगळे उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ येथील ज्ञानदीप बहुउद्देशिय संस्थेने वाचन मंदिराचे बाल सभासद वाढविणे कामी पुढाकार घेतला. यावेळी प. रा.विद्यालयाच्या १६० विद्यार्थ्यांची वाचन मंदिराचे बाल सभासदत्व म्हणून नोंद करण्यात आली. या साठी अंबरनाथ येथील दानशूर व्यक्ती मोहन मुरलीधर कुलकर्णी यांच्या वतीने या सर्व १६० विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शुल्क भरण्यात आले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचक प्रेरणादिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने प.रा. विद्यालयात वाचन मंदिर वार्षिक सभासदत्व वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे, ज्ञानदीप बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रावणी फाटक, मुख्य देणगीदार मोहन कुलकर्णी, प.रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी नलावडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती पौर्णिमा माळी, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर चे संचालक मंडळ सदस्य पंकज माधव भोईर, वाचन मंदिर संस्थेचे कार्यवाह किशोर नागवेकर, खजिनदार उज्ज्वल कुंभार, सहकार्यवाह मिलिंद पळसुले, ज्ञानेश्वर गोसावी, ज्येष्ठ सदस्य गणेश दांडेकर, इत्यादी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधीर सिंगासणे यांनी नमूद केले की, विद्यार्थी दशेतूनच वाचनाची सवय लागणे आवश्यक आहे.पुस्तकासारखा दुसरा कोणताही मित्र नाही. वाचनातून माणूस प्रगल्भ होतो.अनेक मोठ्या व्यक्ती यांनी वाचनाचे महत्त्व नमूद केलेले आहे.त्यामुळे वाचनाशिवाय तरणोपाय नाही, आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगले यश मिळवायचे असेल तर त्याकरता अवांतर वाचन सगळ्यात महत्त्वाचे आहे. या करीता वाचन मंदिराच्या वतीने सर्व विद्यार्थी वर्गांकरिता मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे रविवार १५ ऑक्टोबर पासून पुढील वर्षी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत जो कोणी चांगल्या प्रकारे वाचनात सातत्य ठेवेल, अशा चांगल्या वाचकाचा देखील यापुढे गुणगौरव करण्यात येणार आहे, असे देखील सुधीर सिंगासणे यांनी नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्ञानदीप बहुउद्देशिय संस्थेच्या श्रावणी फाटक, प.रा.विद्यालयाचे योगेश वल्लाल सर, वाचन मंदिराच्या ग्रंथपाल प्रणाली खोडे , शलाका मदन यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन वाचन मंदिर संस्थेचे मिलिंद पळसुले यांनी केले.
