लेखक – निलेश किसन पवार
ता – भिवंडी , जि – ठाणे.
आज 15 ऑक्टोबर ‘ वाचन प्रेरणा दिवस ‘ आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि विलक्षण पुस्तकप्रेमी असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने वाचनाचे आणि पुस्तकांचे महत्व सांगणारा हा लेख.
सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना वाचन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
मित्रांनो, जीवनात अनेक संस्कार महत्वाचे असतात. त्यापैकी एक आहे वाचन संस्कार. माणसाच्या अस्तित्वासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. पण जर माणसाचे भावविश्व फुलवायचे असेल , जीवन संपन्न करावयाचे असेल तर त्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचन करण्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय नक्की लावून घ्यावी. वाचन हे मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे. सतत वाचन केल्याने आपला मेंदू तल्लख , तरतरीत , तेज आणि चपळ राहतो. अखंड वाचनाने मेंदू जागृत राहतो आणि स्मरणशक्तीही तल्लख राहते. वाचनामुळे संपूर्ण मेंदूचा व्यायाम होतो. त्यामुळे स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते. कायम वाचन केल्यास बुद्धीला धार चढते. वाचनाने माणसाची वैचारिक पातळी उंचावते आणि बौद्धिक सामर्थ्यही वाढते . वाचनातूनच विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती या मानसिक शक्तींचा विकास होतो.
वाचनाच्या सवयीमुळे मनाचे आरोग्य चांगले राहते. वाचनामुळे मन , बुद्धी , भावना आणि विचारांचे भरण पोषण होते. वाचन केल्याने माणूस वैचारिकरित्या संपन्न बनतो. जी माणसे कायम वाचन करतात ती ताण तणावापासून दूर राहतात. वाचनाचे संस्कार माणसाच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देतात. वाचनाने अनेक फायदे होतात आणि ते फक्त शाळेतच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की वाचन ही जन्मभर पुरणारी शिदोरी आहे. एकूणच काय तर वाचन माणसाला सर्वगुणसंपन्न बनवते.
जीवनात पुस्तकांचे महत्व मोठे अगाध आहे. पुस्तके माणसाची मस्तके समृद्ध करतात. पुस्तके माणसाच्या शहानपणामध्ये भर घालतात. मनातला अंधार दूर करून मनाला , बुद्धीला आणि विचारांना प्रकाशमान करण्याचे काम पुस्तके करतात. भारतातील अनेक महान माणसे पुस्तकप्रेमी होती. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण , डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए. पी. जे . अब्दुल कलाम या सर्व थोर मंडळींचे वाचन अफाट होते. त्यांच्या जडण घडणीत पुस्तक वाचनाला मोलाचे स्थान होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवर प्रचंड प्रेम होते. ते पुस्तकांनाच आपला खरा मित्र मानायचे. त्यामुळे ते तहान भूक हरपून वाचन करायचे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणायचे , ‘ एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते.’ पुस्तके माणसाला ज्ञानी व बुद्धिमान बनवतात. प्रेरणदायी पुस्तके वाचल्याने मनातली अडगळ स्वच्छ होऊन मनाचे रंग पालटून जातात. पुस्तके आपल्या बुद्धीला गंज लागू देत नाही आणि आपलं व्यक्तिमत्व गढूळ होऊ देत नाही. पुस्तक वाचनातून आपल्याला नक्कीच चांगले विचार , स्फूर्ती , आशावाद आणि सकारात्मकता या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात. जर तुम्हाला जीवनात मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर पुस्तके वाचलीच पाहिजे.
आपल्या आणि समाजाच्या भल्यासाठी पुरातन काळापासून चालत आलेली ही वाचन संस्कृती
टिकायलाच हवी , ती आपण टिकवायलाच हवी. कारण वाचनसंस्कृतीमुळेच सुसंस्कृत समाजाची जडण – घडण होत असते. म्हणून आपण सगळ्यांनी कायम वाचत रहावं आणि समृद्ध होत रहावं.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
