भिवंडी दि.१० ( गांवकरी TODAY NEWS ) चार मित्रांपैकी दोन मित्रांमध्ये वाद असलेल्यांपैकी एका मित्राच्या पत्नीच्या वाढदिवसाला तिसऱ्या मित्राने दुसऱ्या मित्राला बोलावल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाल्याने दोन मित्रांनी आपसात संगनमत करून मित्रालाच लाथा बुक्क्यांसह दगडाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कार्तिक व त्याचा मित्र गणेश शंकर येमुला (४०) अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्रांची नावे आहेत.तर राजकीरण अशोक चिप्पा (३०) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मित्र गणेश,कार्तिक व राजकीरण आणि सूरज हे चौघे चांगले मित्र आहेत.परंतु गणेश आणि राजकीरण या दोघांमध्ये काही कारणावरून वाद होऊन ते एकमेकांसोबत बोलत नव्हते.दरम्यान रविवारी ८ ऑक्टोबर रोजी गणेशच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने सुरजने राजकीरण यास पद्मानगर परिसरातील गणेश टॉकीजजवळ बोलवले.परंतु सुरजला गणेश व राजकीरण यांच्यातील भांडण माहिती असतानाही त्याने राजकीरण यास वाढदिवसाला आमंत्रित केल्याच्या रागातून फिर्यादी राजकीरणने सूरज यास शिवीगाळ केली.त्यानंतर तो दुचाकीवरून घटनास्थळावरून जाण्यास निघाला असता,सुरजला शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपी कार्तिक व गणेशने आपसात संगनमताने राजकीरणला लाथा बुक्क्यांच्या मारहाणीसह दगडाने मारून त्यास गंभीर जखमी केले आहे.त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या मारहाण प्रकरणी दोघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना तडवी करीत आहेत
