भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) चार मित्रांपैकी एकाच्या विरोधात उलटसुलट बतावणी केल्याचा आरोप करीत दोघांनी आपसात संगनमत करून रागातून मित्रालाच शिवीगाळ करीत लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेम म्हात्रे व त्याचा मित्र विघ्नेश कैलास पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मारहाणीत गंभीर जखमी झालेला आर्यन सत्यवान पाटील हा तरुण शिक्षण घेत आहे.दरम्यान दोघे आरोपी,आर्यन व भिवंडीतील डोंगराळी येथील प्रेम साळुंखे हे चौघेही मित्र आहेत.तर या चार मित्रांपैकी दोघा आरोपींनी आपसात संगनमत करून आर्यनला ३ ऑक्टोबर रोजी रात्री पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास वेहळे कमानीजवळ बोलावले.त्यावेळी विघ्नेशने त्याच्याबद्दल प्रेम साळुंखेला उलटसुलट बतावणी करीत असल्याचा आर्यनवर आरोप केला.दरम्यान आर्यनने दोघा आरोपींना आरोपाचे खंडन करीत त्याने कोणाबद्दल काहीही न बोलल्याचे सांगितले.परंतु सदर गोष्टीचा राग मनात धरून दोघा आरोपी मित्रांनी आपसात संगनमत करून आर्यनला शिवीगाळ करीत हाताच्या चापटीने मारहाण करून लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर व पायावर मारून त्यास गंभीर जखमी केले आहे.आर्यनवर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या फिर्यादीवरून प्रेम व विघ्नेश या दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२४ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि धिवार करीत आहेत
